लेखापरीक्षण वर्गवारी सूचनांचे उल्लंघन केल्यास आता होणार कारवाई.. | पुढारी

लेखापरीक्षण वर्गवारी सूचनांचे उल्लंघन केल्यास आता होणार कारवाई..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील नागरी, ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था व सेवक सहकारी पतसंस्थांच्या वैधानिक लेखापरीक्षण वर्गवारीचे सुधारित निकष सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी जाहीर केले आहेत. लेखापरीक्षण वर्गवारीमुळे संस्थेची आर्थिक व सांपत्तिक स्थिती सुयोग्य असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे लेखापरीक्षण वर्गवारी गुणतक्ता वैधानिक लेखापरीक्षण अहवालासोबत जोडणे अनिवार्य करण्यात आले असून, परिपत्रकाच्या सूचनांचे उल्लंघन केल्यास लेखापरीक्षकावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
वैधानिक लेखापरीक्षकाने लेखापरीक्षण पूर्ण केल्यानंतर संस्थेस लेखापरीक्षण वर्गवारी देणे आवश्यक आहे. ही वर्गवारी अ, ब, क आणि ड या वर्णाक्षराने निश्चित केल्याने अनुक्रमे उत्कृष्ट, निश्चित चांगला, चांगला व वाईट अशी संस्थेची आर्थिक पत व विश्वासार्हता निश्चित करण्यासाठी सुलभता प्राप्त होते. लेखापरीक्षा वर्गवारी गुणतक्ता निकष निश्चितीमुळे लेखापरीक्षा वर्गवारी प्रदानामध्ये एकसमानता व एकसूत्रता राखली जाते. आगामी वर्ष 2024-25 व त्यापुढील आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षणाकरिता लागू राहील. सहकार कायद्यान्वये सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेद्वारे किंवा निबंधकाद्वारे चालू आर्थिक वर्षासाठी नामतालिकेवरील अर्हताधारक (पॅनेलवरील) लेखापरीक्षकाची सहकारी संस्थेचे वैधानिक लेखापरीक्षणाकरिता नेमणूक करण्यात येते.
यापूर्वीच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या समितीने सहकार आयुक्तालयास आपला अहवाल सादर केला. त्यानंतर सुधारित प्रारूप गुणतक्ता मसुदा व मार्गदर्शक सूचना अंतिम करण्यात आल्या आहेत. लेखापरीक्षण वर्गवारी गुणतक्त्यात भांडवल निधीचे जोखीमभारीत जिंदगीशी प्रमाण (सीआरएआर), जिंदगीची गुणवत्ता (अ‍ॅसेट क्वॉलिटी), व्यवस्थापन, उत्पन्न, तरलता (लिक्विडिटी), कार्यपद्धती व नियंत्रण यांचा समावेश आहे. आयुक्तालयाने निश्चित केलेल्या गुणतक्त्यामध्ये परस्पर कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येऊ नये, असेही परिपत्रकात नमूद केले आहे.
हेही वाचा

Back to top button