पाताळेश्वरचा भव्य नंदीमंडप जीर्ण : पुरातत्व विभागाकडून परिसर ‘सील’ | पुढारी

पाताळेश्वरचा भव्य नंदीमंडप जीर्ण : पुरातत्व विभागाकडून परिसर ‘सील’

आशिष देशमुख

पुणे : शहराच्या प्राचीन वैभवात भर घालणारा जंगली महाराज रस्त्यावरील पाताळेश्वर महादेवासमोरचा भव्य नंदीमंडपच धोक्यात आहे. येथील बाहेरील बारापैकी तीन खांबांची स्थिती अतिशय नाजूक असून, ते कमकुवत झाल्याने मंडपाचा काही भाग कोसळला आहे. हा मंडप पुरातत्व विभागाने नुकताच सील करून धोक्याची सूचना देणारा फलक लावला आहे. जंगली महाराज रस्त्यावर पाताळेश्वर लेणी आहे. ज्याला पांचाळेश्वर मंदिर, पांडव गुहा मंदिर, असेही संबोधले जाते. राष्ट्रकुट काळातील आठव्या शतकातील हे मंदिर असावे, असा अंदाज आहे. अखंड खडकात कोरून तयार केलेले हे शिवालय विलोभनीय आहे. अर्धगोलाकार जागेवर भव्य शिवालय आहे. उजव्या बाजूला पार्वतीमातेचे तर डाव्या बाजूला प्रभूरामचंद्र परिवाराच्या अलीकडच्या काळातील मूर्ती दिसतात. या मंदिराच्या समोर अतिशय भव्य नंदीमंडप आहे. त्याचा काही भाग ढासळला असून डागडुजी सुरू आहे.

संरक्षित स्मारक हे मंदिर

हे मंदिर राज्य पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असून, ते संरक्षित स्मारक आहे. त्यामुळे पुरातत्व विभागच त्याची डागडुजी आणि देखभाल करीत आहे. मंदिराच्या आवारात सुंदर बाग असून, तेथे पुरातत्व विभागाचे कार्यालय आहे, याचे मुख्यालय मुंबईत आहे.

अखंड खडकात साकारलेले

पाताळेश्वर लेणी म्हणजे एका खडकाळ टेकडीवर केलेले अखंड उत्खनन आहे. प्रवेशद्वार संकुलाच्या पूर्वेकडून सुमारे 20 फूट लांब मार्गावर आहे. हा मुळात खोदलेला बोगदा होता. पण तो कोसळला, अशी नोंद सापडते. काही काळासाठी दगडी बांधकाम केले गेले. या मोकळ्या मंडपाचे छत बेसॉल्ट खडकाचे आहे.

16 खांबांवर नंदीमंडप

भव्य अशा नंदीमंडपाला एकूण 16 खांब आहेत. आतल्या बाजूस चार तर बाहेरच्या बाजूने 12 खांब आहेत. त्यातील काही खांबांना तडे गेलेले दिसतात. महादेवाकडे तोंड करून उभे राहिल्यास नंदीच्या उजव्या बाजूच्या तीन खांबांची स्थिती जीर्ण झाल्याने छताच्या वरचा भागाचा कोपरा कोसळला आहे.

डागडुजी सुरू

या ठिकाणी लोखंडी बार लावून डागडुजी सुरू आहे. तसेच संपूर्ण मंडप सील करून आत येण्यास मज्जाव करणारा सूचनाफलक तेथे पुरातत्व विभागाने लावला आहे. या ठिकाणी गजानन मांडोळे हे पुरातत्व विभागाचे अधिकारी काम पाहतात. मात्र ते सुटीवर असल्याने याविषयी अधिक बाजू समजू शकली नाही.

हेही वाचा

Back to top button