‘आधी आरक्षण; मग इलेक्शन’ : मराठा समाजाचे शेकडो उमेदवार अर्ज भरणार | पुढारी

‘आधी आरक्षण; मग इलेक्शन’ : मराठा समाजाचे शेकडो उमेदवार अर्ज भरणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सकल मराठा समाजाची बैठक झाली. सरकारने फसवणूक केल्याच्या निषेधार्थ शिरूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत हडपसर विधानसभा मतदारसंघातून शंभरहून अधिक उमेदवारी अर्ज भरण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला. मराठा आरक्षण समन्वयक समिती, हडपसर यांच्या वतीने आयोजित बैठकीला हनुमंत मोटे, संदीप लहाने पाटील, दत्तात्रय जाधव, अतुल येवले, उत्तम कामठे, राहुल जगताप, राजेंद्र जगदाळे यांच्यासह मराठा समाजाचे बांधव बैठकीत सहभागी झाले होते.

राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देतो असे सांगून ज्या मागण्या आंदोलक म्हणून मनोज जरांगे यांनी केल्या त्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. जे मागितलेच नाही ते दहा टक्के आरक्षण देऊन समाजाची बोळवण केली. तसेच आंतरवाली सराटीत 24 मार्चला जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्याची तसेच देशातील 14 राज्यांतील मराठा बांधवांची बैठक होत असून या बैठकीत हडपसर आणि परिसरातून जास्तीत जास्त संख्येने समाज बांधवांनी जाण्याचे आवाहन समाजाला करण्यात आले.

ठराव पारीत

या बैठकीत काही महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले. त्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत हडपसर विधानसभा मतदारसंघातून शंभरहून अधिक मराठा समाजाच्या बांधवानी उमेदवारी अर्ज भरणे, समाजातील बांधवांवर दाखल केलेले गुन्हे शासनाने मागे घ्यावेत, तसेच 24 मार्च रोजी होणार्‍या बैठकीत घेण्यात येणार्‍या निर्णयानुसार पुढील दिशा ठरविली जाईल. त्याचबरोबर हडपसर आणि परिसरातील संपूर्ण मराठा समाज हा मनोज जरांगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार न करता जो समाजासाठी उभा राहील तो आमचा उमेदवार राहील, अशी भूमिका मराठा आरक्षण समन्वयक समिती, हडपसर यांच्या वतीने या वेळी घेण्यात आली.

हेही वाचा

Back to top button