हिपॅटायटीस ए आणि हिपॅटायटीस ई संसर्ग कशामुळे होतो? | पुढारी

हिपॅटायटीस ए आणि हिपॅटायटीस ई संसर्ग कशामुळे होतो?

डॉ. अमित मांडोत

हिपॅटायटीस हा यकृताचा एक दाह असून, तो हिपॅटायटीस विषाणूमुळे होतो. त्यामुळे शरीरातील ऊतींना दुखापत किंवा संसर्ग झाल्यास सूज येते. यामुळे शरीरातील इतर अवयवांचेही नुकसान होते. अभ्यासांनुसार, हिपॅटायटीस ए, बी, सी, डी आणि ई यासह अनेक प्रकारचे विषाणू हिपॅटायटीसला कारणीभूत आहेत. शिवाय, एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या विष्ठेद्वारे, दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे हिपॅटायटीस ए आणि हिपॅटायटीस ई संसर्ग होऊ शकतो.

हिपॅटायटीस ए आणि ई दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे संक्रमण होते, तसेच हिपॅटायटीस बी आणि सी रक्त किंवा शारीरिक द्रवाद्वारेही याचे संक्रमण होते. हिपॅटायटीस ‘डी’ संसर्ग हा फक्त हिपॅटायटीस ‘बी’ची लागण झालेल्यांनाच होतो. व्हायरल हिपॅटायटीसपासून बचाव करण्यासाठी पुरेशी खबरदारी घेणे हीच काळाची गरज आहे.
व्हायरल हिपॅटायटीस हा रक्त संक्रमणाद्वारे किंवा बाळाच्या जन्मादरम्यानदेखील संसर्गाने होऊ शकतो.

गंभीर स्वरूपाच्या हिपॅटायटीसमध्ये (हिपॅटायटीस बी आणि सी) दीर्घकालीन गुंतागुंत रोखण्यासाठी लवकरात लवकर निदान आणि उपचार होणे आवश्यक असते. विषाणुजन्य हिपॅटायटीसचे निदान जर विषाणूने यकृतावर परिणाम करण्याच्या आधी झाले तर हा आजार बरा करण्यासाठी प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. काही केसेसमध्ये जर यकृताचे गंभीर नुकसान आधीच झालेले असेल तर यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता भासते.

प्रतिबंध

  • जागरूक राहावे.
  • नेहमी शुद्ध पाणी प्यावे. शौचालय, घर, आजूबाजूचा सर्व परिसर कायम स्वच्छ ठेवावा.
  • सर्वांचे लसीकरण झालेले असणे महत्त्वाचे आहे.
  • असुरक्षित लैंगिक संबंध ठेवू नयेत.

 

Back to top button