दैव बलवत्तर म्हणूनच वाचले लाकूडतोड्याचे प्राण; जिवावर बेतले, पायावर निभावले | पुढारी

दैव बलवत्तर म्हणूनच वाचले लाकूडतोड्याचे प्राण; जिवावर बेतले, पायावर निभावले

कोंढवा : पुढारी वृत्तसेवा : झाडाची फांदी 30 फूट उंचीवर तोडत असताना अचानक तीच फांदी अर्धवट तुटली व त्याच्यामध्ये लाकूडतोड्याचा पाय अडकला. वेदनेमुळे तो जोरजोराने ओरडू लागला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लोकांनी तातडीने अग्निशमन दलाला याची माहिती दिली. जवानांनी वेळीच अथक प्रयत्न करून लाकूड तोडणार्‍या व्यक्तीचे प्राण वाचविले व त्याला तातडीने जवळच्या खासगी दवाखान्यात दाखल केले. ही घटना बुधवारी सकाळी नऊ वाजता वानवडीमध्ये घडली.

वानवडीतील केदारीनगर येथील ऑक्सफर्ड प्रीमियम या सोसायटीमधील धोकादायक झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी बुधवारी सकाळी आकाश रामा पवार (वय 28) हे झाडावर चढले होते. मोठी फांदी तोडत असताना ती अर्धवट तुटली आणि तिच्या खाली पवार यांचा पाय अडकला. लोकांच्या प्रसंगावधानामुळे अग्निशमन दलाचे जवान काही वेळातच घटनास्थळी पोहचले. अग्निशमन दलाचे जवान तांडेल राहुल बांदल यांनी शिडीवरून जाऊन आकाश पवार यांचा पाय फांदीतून काढला व स्वतःच्या खांद्यावरून त्यांना तीस फूट उंचीवरून खाली आणले. या वेळी अग्निशमन केंद्रप्रमुख समीर शेख, कैलास शिंदे, रामराज बागल, प्रसाद शिंदे, संतोष माने यांनी याकामी अथक प्रयत्न केले व आकाश पवार यांचे प्राण वाचविले.

अधिकार्‍यांचे दुर्लक्ष; फेब्रुवारीतच मिळाली होती परवानगी

केदारीनगर गल्ली नं. 2 मधील स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेली दोन वर्षे सोसायटीचे चेअरमन व पदाधिकारीवर्गाला सोसायटीच्या संरक्षण भिंतीबाहेर गल्लीमध्ये आलेल्या धोकादायक फांद्या तोडण्यासाठी विनंती करीत आहेत. मात्र, त्यास सोसायटीचे पदाधिकारी दाद देत नव्हते. सध्या परिसरात वादळी वार्‍यामुळे अनेक झाडे पडली आहेत. परवा आमच्या गल्लीत फांदी पडली. हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिल्यामुळे त्यांनी आज फांद्या तोडण्याचे काम हाती घेतले होते. त्यांना फांद्या तोडण्याची परवानगी पालिका प्रशासनाने  फेब्रुवारी महिन्यात दिली असतानादेखील सोसायटीने फांद्या आत्तापर्यंत का तोडल्या नाहीत? असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत. पालिका उद्यान अधिकारी व सोसायटीचे चेअरमन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र होऊ शकला नाही.

हेही वाचा

Back to top button