‘मुख्यमंत्री माझी शाळा’मध्ये राज्यात बारामतीचा झेंडा! | पुढारी

‘मुख्यमंत्री माझी शाळा’मध्ये राज्यात बारामतीचा झेंडा!

बारामती : पुढारी वृत्तसेवा : ‘मुख्यमंत्री माझी शाळा’ हे अभियान नुकतेच राज्यात राबविण्यात आले. यामध्ये खासगी शाळांमध्ये बारामतीच्या अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदानगर येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतन शाळेने राज्यामध्ये दुसरा क्रमांक पटकाविला. या शाळेने तब्बल 21 लाख रुपयांचे पारितोषिक पटकाविले आहे. या अभियानामध्ये राज्यातील एक लाख तीन हजारांहून अधिक शाळांनी भाग घेतला होता. राज्यातील एक कोटी 99 लाख विद्यार्थ्यांनी या योजनेत सहभाग घेतला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ’मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानाचे मूल्यांकन समितीने 29 फेब—ुवारी रोजी मूल्यांकन केले आणि आठ विभागांतील प्रत्येकी एक शाळा निवडण्यात आली.

यामध्ये सरकारी व खासगी शाळांचे मूल्यांकन करण्यात आले. खासगी शाळांमध्ये राज्यात शारदाबाई पवार विद्यानिकेतन शाळेने दुसरा क्रमांक मिळविला. येत्या 5 मार्चला मुंबई येथे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शाळेला हा पुरस्कार प्रदान होणार आहे.
या अभियानामध्ये शाळेने केलेली वीजबचत, आर्थिक साक्षरता, डिजिटल उपकरणांचा वापर, लोकशाही संसदीय मूल्यांचा वापर, वैज्ञानिक दृष्टिकोन या बाबींचे मूल्यांकन करण्यात आले. त्याचबरोबर प्रधानमंत्री पोषण अभियानांतर्गत परसबाग अन्नाची योग्यरीतीने विल्हेवाट व व्यवस्थापन तसेच शाळेतील मूल्यसंस्कार, वृक्षसंवर्धन, वडीलधार्‍यांचा सन्मान, अशा अनेक बाबींचा यामध्ये समावेश करण्यात आला होता.

या सर्व बाबींमध्ये हजारो शाळांच्या मूल्यांकनात शारदानगरच्या शाळेने बाजी मारली. अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, संस्थेचे समन्वयक प्रशांत तनपुरे यांनी मुख्याध्यापक सूर्यकांत मुंडे व त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे अभिनंदन केले. सर्व पदाधिकार्‍यांनी वेळोवेळी केलेल्या अमूल्य मार्गदर्शनामुळेच शाळेने हा नावलौकिक मिळविल्याची कृतज्ञता मुख्याध्यापक सूर्यकांत मुंडे व त्यांच्या सहकार्‍यांनी व्यक्त केली.

हेही वाचा

 

Back to top button