चित्रपटात काम केलेला 900 किलोचा ‘मोहन’ अवतरला मंडईत | पुढारी

चित्रपटात काम केलेला 900 किलोचा ‘मोहन’ अवतरला मंडईत

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : ग्रँट रोड येथील लोकमान्य टिळक मंडईत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना रविवारी सकाळी अवाढव्य नंदीबैलाचे दर्शन झाले. ‘मोहन’ असे या नंदी बैलाचे नाव आहे. त्याचे वजन तब्बल 900 किलो असून उंची साडेसहा फूट आहे. मोहन आता 22 वर्षांचा झाला आहे. या नंदी बैलाच्या खाद्याचा खर्च साधारणपणे एका दिवसाला पाचशे रुपये आहे. म्हणजे महिन्याकाठी सुमारे 15 हजार रुपये त्याच्या खाण्यापिण्यावरच खर्च होत असतात.

संबंधित बातम्या

मोहनला आतापर्यंत अनेक हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम मिळाले आहे. त्यापैकी ‘बाहुबली 2’ या सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटात मोहनला अनेकांनी पाहिले आहे. त्याबरोबरच सनी देओलच्या ‘अजिंक्य’ आणि अजय देवगनच्या ‘जान’ या चित्रपटातही मोहनला काम मिळाले होते. मोहनच्या रुबाबदारपणामुळे त्याच्या मालकांना फिल्म इंडस्ट्रीतून सतत फोन येत असतात. त्यामुळे त्याच्या मालकांच्याही उदरनिर्वाहाला हातभार लागतो.

मोहनचे मालक मोहनला नाशिक येथील शनिशिंगणापूर येथून घेऊन आले आहेत. गावोगावी फिरून ते मुंबईत दाखल झाले आहेत. नंदीबैलाला घेऊन या गावातून त्या गावात फिरून उदरनिर्वाह करणे हा त्यांचा पिढीजात व्यवसाय आहे. मोहनला पाहून अनेकजण त्याच्याकडे आपल्या मनातल्या इच्छा प्रकट करतात. त्या इच्छा पूर्ण होणे, न होणे देवाच्या हातात आहे, असे त्याचे मालक सांगतात.

Back to top button