कार्यशिक्षणातून सामाजिक क्षमता होणार विकसित.. | पुढारी

कार्यशिक्षणातून सामाजिक क्षमता होणार विकसित..

गणेश खळदकर

पुणे : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाने तीन ते आठ वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी नेमका अभ्यासक्रम कसा असावा, याचा एक आराखडा जाहीर केला आहे. यामध्ये विविध विषय असून, कार्यशिक्षण विषयातून विद्यार्थ्यांच्या सामाजिक, भावनिक, नैतिक क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या भावना समजून घेण्याची आणि त्या व्यवस्थापित करण्याची क्षमता ही बोधात्मक बुद्धिमत्तेइतकीच महत्त्वाची आहे, हे आता प्रस्थापित झाले आहे. आपल्याला जर स्वत:च्या भावना समजून घेता आल्या तर यामुळे समानानुभूती आणि सहिष्णुता या भावना विकसित होण्यास मदत होते.

या टप्प्यावरील शिक्षण परिणामामुळे भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्तेचा भक्कम पाया घातला जातो. यातूनच बालके आपली भावनिक बुद्धिमत्ता विकसित करतात. त्यांचा सामाजिक विकास होतो. कार्यशिक्षणातून बालकांची कारककौशल्ये गणित, भाषाज्ञान तसेच सामाजिक, भावनिक विकास, नैतिक जाण वाढावी, असा प्रयत्न करण्यात येत आहे. कार्यशिक्षण विषयाच्या विविध कृतींमधून बालकांची मानवी संवेदना, संविधानातील मूल्ये विकसित होतील, त्याबरोबरच ते तार्किक पद्धतीने विचार करतील, त्यांची निर्णयक्षमता वाढेल, असे उपक्रम सुचविलेले आहेत. कार्यशिक्षणाच्या विविध उपक्रमांद्वारे बालकांच्या भविष्यातील व्यावसायिकतेची नांदी याच स्तरामध्ये सुरू होणार आहे.

कशावर आहे भर…

1) श्रमप्रतिष्ठा : श्रम आणि कौशल्य, यावर आधारित कामे करणे तसेच श्रमजीवी लोकांबद्दल आदराची भावना ठेवून सन्मान करणे.
2) उद्योजकतेचे शिक्षण : बालकांमध्ये उद्योजकतेविषयी असलेल्या सुप्त गुणांचा विकास करणे.
3) जीवनक्षमता विकसित करणारी कौशल्ये : बालकांच्या गरजा व समस्या यांच्याशी निगडित उपक्रमांद्वारे निरोगी व आनंदमय जीवन जगण्यासाठी कौशल्ये विकसित करण्यात मदत करणे.
4) समाजोपयोगिता : कार्यशिक्षणातील उपक्रमातून समाजातील उद्योगमूलक कार्याची ओळख करून घेण्याची संधी प्राप्त करून देणे.
5) कार्यातील स्व-भूमिकेची समज : विविध उपक्रमांतील कार्यनिश्चितीनंतर त्या कार्यातील स्व-भूमिका समजावून घेऊन त्यातील कार्यकारणभाव, शास्त्रीय तत्त्वे व क्रमवारिता यांची माहिती घेणे.
6) अर्थोत्पादनक्षमता : उत्पादक उपक्रमाचा सराव करताना बालकांमध्ये उत्पादनास आवश्यक अशी प्राथमिक कौशल्य निर्माण करणे.
7) कार्यकौशल्य विकास : उत्पादक कार्यातील सुबकता, अचूकता, आकर्षकता, गतीनिर्मिती, प्रदर्शन व विक्रीबाबतची कौशल्य विकसित करणे.
8) कार्यसंस्कृतीचे जतन व संवर्धन : परिसरातील विविध कार्यांची ओळख करून घेणे. सामाजिक रूढी, परंपरा आणि प्रथा यांच्या मागील कार्याची ओळख करून घेणे.
9) अनिवार्य उपक्रम : सर्व शाळांमध्ये उपक्रमाबाबतीत एकसूत्रीपणा आणण्यासाठी व बालकांमध्ये समाजोपयोगी कार्याची वृत्ती जोपसण्यासाठी अनिवार्य उपक्रमांची योजना करणे.
10) कार्यशिक्षणातून पर्यावरणाची जाणीव : अनिवार्य उपक्रमातून तसेच उत्पादक उपक्रमातून पर्यावरण संरक्षण व संवर्धन यांची जाणीव व निर्माण करणे.

कार्यशिक्षणाची उद्दिष्टे :

1) आधुनिक तंत्रज्ञान, राष्ट्रीय परंपरा, संस्कृती यांचा समन्वय साधण्यासाठी आवश्यकता समजून घेणे.
2) स्थानिक वैश्विक व मुक्त व्यवस्था यांचा होणारा सकारात्मक व नकारात्मक प्रभाव जाणून घेणे.
3) नैसर्गिक, सामाजिक व मानवी आंतरक्रियेची जाणीव निर्माण करणे.
4) मानवी जीवनातील ताणतणाव ते दूर करण्याचे मार्ग व त्यांची साधणे जाणून घेणे.
5) दैनंदिन जीवनातील माहितीचे आकलन व उपयोजन करून निश्चित दिशा विकसित करणे.
6) नैतिक, सामाजिक व राष्ट्रीय मूल्यांभोवती गुण केंद्रीभूत करून समाजाला उपयोगी नागरिक घडविणे.
7) पूर्वव्यावसायिक व व्यावसायिक कौशल्य विकसित करणे.
8) आधुनिक तंत्रज्ञान व मानवी कार्यक्षमता या एकमेकांस पूरक राहतील याची जाणीव निर्माण करणे.
9) दृकश्राव्य कलांच्या सादरीकरणातून सृजनशीलता व स्वयंप्रकटीकरण क्षमता जोपासणे.
10) सार्वजनिक साधनसंपत्तीची जपणूक करणे.

हेही वाचा

Back to top button