तक्रार मागे घे, नाहीतर तुला..; अश्लील वर्तन करून महिलेचा विनयभंग | पुढारी

तक्रार मागे घे, नाहीतर तुला..; अश्लील वर्तन करून महिलेचा विनयभंग

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महिलेचा हात पकडून तिच्यासोबत अश्लील वर्तन करून विनयभंग केला. तसेच, चाकू काढून पोलिसांत केलेली तक्रार मागे घेतली नाही, तर जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार कोंढवा बुद्रुकमधील पुण्यधाम रस्त्यावर शनिवारी (ता. 17) सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास घडला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बिबवेवाडीत राहणार्‍या 30 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमित आप्पासो चव्हाण (वय 32, रा. उंड्री) याच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे आणि आरोपीचे पूर्वी वाद झाले होते. त्यामुळे त्यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दिली होती. शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास महिला त्यांच्या सासूची वाट पाहत थांबल्या होत्या. त्या वेळी आरोपी त्याठिकाणी आला. त्याने महिलेचा हात पकडून जवळ ओढून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच, चाकू काढून म्हणाला की, कोंढवा पोलिस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घे. तक्रार मागे घेतली नाहीतर तुला आणि तुझ्या पतीला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्या ठिकाणी असलेल्या झाडांच्या कुंड्या आपटून गोंधळ घालत दहशत निर्माण केली. तसेच, तू एकटी कुठे भेटली तर तुला मारून टाकीन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे करत आहेत.

हेही वाचा

Back to top button