महिला मारहाण प्रकरण : सहायक पोलिस निरीक्षकासह दोन महिला पोलिस निलंबित | पुढारी

महिला मारहाण प्रकरण : सहायक पोलिस निरीक्षकासह दोन महिला पोलिस निलंबित

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हडपसर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या मगरपट्टा सिटी पोलिस चौकीत घरकाम करणार्‍या महिलेवर चोरीचा आळ घेऊन तिच्यासोबत मारहाण (गैरवर्तन) केल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह दामिनी पथकातील दोन महिला पोलिसांचे निलंबन केले आहे. पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक महिला पोलिस अंमलदार उषा सोनकांबळे आणि वैशाली उदमले अशी निलंबीत केलेल्या पोलिसांची नावे आहेत. हडपसर पोलिस ठाण्यात 1 फेब्रुवारीला चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

त्या गुन्ह्यातील फिर्यादीने घरकाम करणार्‍या महिलेने चोरी केल्याचा संशय व्यक्त केला होता. त्या घर काम करणार्‍या महिलेला 9 फेब्रुवारी रोजी हडपसर पोलिसांनी मगरपट्टा पोलिस चौकीत चौकशीसाठी आणले होते. यावेळी पोलिसांनी महिलेला बेदम मारहाण केल्याचा आरोप संबंधित महिला आणि तिच्या नातेवाईकांनी केला होता. त्यासंबंधी व्हिडीओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता.
याची दखल घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याच्या सूचनाप्रमाणे संबंधित महिलेच्या आरोपाच्या तक्रारीवरून चौकशी सुरू करण्यात आली. दरम्यान, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद दोरकर, सोनकांबळे आणि उदमले यांना निलंबीत केले आहे.

हेही वाचा

Back to top button