धक्कादायक ! मोबाईल चोरीच्या संशयातून महिलेचा खून | पुढारी

धक्कादायक ! मोबाईल चोरीच्या संशयातून महिलेचा खून

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मोबाईल चोरीचा संशय घेत एका महिलेस तिच्या साथीदारासह बांबूने बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवार पेठेत श्रीनाथ थिएटरजवळ सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. वर्षा शिवाजी थोरात (वय 25, रा. पर्वती) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा साथीदार आनंद बाळू सोनवणे (वय 30, रा. बुधवार पेठ) याने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अब्दुल सय्यद (रा. बुधवार पेठ), गौरव चौगुले (रा. कसबा पेठ) यांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला वर्षा थोरात ही फिरस्ती विक्री करून बुधवार पेठेत फिरून उदरनिर्वाह करायची. तिच्यावर काही गुन्हेही दाखल आहेत. तर तिचा साथीदारही फिरस्ता आहे. बुधवार पेठ परिसरात आरोपींची अंडा भुर्जीची गाडी आहे. त्यांचा मोबाईल चोरीला गेल्यावर त्यांनी वर्षावर संशय व्यक्त केला. सोमवारी सकाळी वर्षा आणि तिचा सहकारी हे बुधवार पेठेतील श्रीनाथ थिएटरजवळ चहा पिण्यासाठी आले होते. या वेळी आरोपी अब्दुल सय्यद आणि गौरव चौगुले येथे आले आणि यानंतर तिला आणि तिच्या साथीदाराला बांबूने जबर मारहाण केली. यामध्ये वर्षा बेशुध्द पडली असता तिल ससून रुग्णालयात नागरिकांनी दाखल केले. तेथे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक वैभव गायकवाड करत आहेत.

हेही वाचा

Back to top button