चाकण, खेड एमआयडीसीत ‘ठेकेदार तुपाशी कामगार उपाशी’ | पुढारी

चाकण, खेड एमआयडीसीत ‘ठेकेदार तुपाशी कामगार उपाशी’

तुषार मोढवे

कडूस : अल्पावधीतच उद्योगनगरी म्हणून नावारूपाला आलेल्या चाकण, खेड एमआयडीसीत ठेकेदारी, कंत्राटी पद्धत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, ’ठेकेदार तुपाशी आणि कामगार उपाशी’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खेड तालुक्यात चाकण, खेड, आंबेठाण, म्हाळुंगे, खालुंब्रे, सावरदरी, वराळे, कुरुळी, मोई, चिंबळी, मेदनकरवाडी, खराबवाडी आदींसह परिसरात विविध नामांकित कंपन्या मोठ्या प्रमाणात उभ्या राहिल्या आहेत. या कंपन्यांमध्ये दररोज लाखो कामगार आपल्या हाताला काम मिळावे म्हणून नोकरीच्या शोधासाठी धडपड करीत असतात.

या विविध कंपन्यांमध्ये ठेकेदारी पद्धतीने कामगार भरती करीत असल्याने कामगारांची विविध प्रकारे फसवणूक करून अल्पप्रमाणात मोबदला देऊन अधीक काम करून घेण्याचे प्रकार सुरू आहेत. कामगारांच्या आरोग्याचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता कमी पगारात अधिक काम करून घेत असल्याने ठेकेदारांना मात्र खेड चाकणसारख्या औद्योगिक नगरीमध्ये ’अच्छे दिन’ आले आहेत. काबाडकष्ट करून आपल्या हातावर पोट असलेल्या कामगारांना मात्र जेमतेम पगार देऊन फसवणूक केली जात असल्याचा आरोप कामकारांनी केला आहे.

स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय
चाकणसह परिसरात विविध नामवंत कंपन्या उभ्या राहिल्या. यामुळे परिसरातील स्थानिक तरुणांना हक्काचा रोजगार उपलब्ध होईल, असे सुरुवातीला वाटत होते. औद्योगिक वसाहत व शासनाच्या विविध विकास प्रकल्पांसाठी भूमिपुत्रांनी जमिनी दिल्या. मात्र, परिस्थिती वेगळी झाली असून, स्थानिक तरुणांवर बेरोजगारी निर्माण झाली आहे. जमीन देऊनही तालुक्यातील उच्चशिक्षित तरुणांना मात्र या कंपन्यांमध्ये काम मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

ठेकेदार आणि मालकांमध्ये वादविवाद
चाकणसह परिसरात असणार्‍या कंपन्यांमध्ये सर्वत्र ठेकेदारी पद्धत असल्याने कायमस्वरूपी कामगारांना घरी पोहचविण्याच्या वाहनापासून ते कामगार भरतीपर्यंत ठेकेदारी पद्धत आहे. हा ठेका आपल्याला मिळावा म्हणून अनेकदा आपापसांत ठेकेदारांमध्ये व मालकांमध्ये टोकाचे वाद होत असल्याने यात अनेकदा मारामारी, हमरीतुमरीसारखे
प्रकार घडतात.

टोळ्यांवर अंकुश लावण्याची गरज
विविध स्वयंघोषित संघटना, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्या या औद्योगिक वसाहतीत सक्रिय झाल्या असून, या ठिकाणी भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. अशा टोळ्यांवर अंकुश लावण्याची देखील गरज निर्माण झाली आहे.

 

Back to top button