दौंडला जलजीवन मिशनचा उडाला फज्जा | पुढारी

दौंडला जलजीवन मिशनचा उडाला फज्जा

केडगाव : पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशन या कोट्यवधी रुपये खर्चाच्या नळपाणी पुरवठ्याच्या योजनेचा दौंड तालुक्यात पूर्णपणे फज्जा उडला असून नळातून स्वच्छ, पुरेसे पाणी गावकर्‍यांना मिळेल की नाही हीच मोठी शंका निर्माण झालेली आहे.
गावगावात योजना करण्यासाठी खाजगी संस्थेकडूनआराखडा तयार करण्यात येऊन त्याच आधारे सगळ्या मान्यता मिळवल्याने कागदपत्रांचा खरा घोळ अलीकडच्या काळात घोटाळेबाज होऊ लागला आहे. सध्या तीस ते चाळीस टक्के कामे झालेल्या गावातील पाण्याच्या टाक्यांची जागाच ठरत नाही तर कुठे उद्भवाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

तालुक्यामध्ये माटोबा आणि व्हिक्टोरिया तलाव या दोन तलावांच्या साठ्या मधून काही गावांना पाण्याचा स्रोत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. व्हिक्टोरिया तलाव येथील वरवंड मध्ये असलेल्या पाण्याचा साठा 195 दशलक्ष घनमीटर एवढा असून यामधून कुरकुंभ औद्योगिक वसाहतीलापाणीपुरवठा सुरू आहे. नव्या कुसेगाव, पडवी, देऊळगाव, गाडा, केडगाव, बोरी पार्धी, कडेठाण, हातवळण आणि वरवंड आदी गावांना या तळ्यातून पाणी कसे मिळणार हा मोठा प्रश्न आहे. माटोबा तलावाची आजची पाण्याची साठवणूक 167.73 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. या ठिकाणावरून 210.80 पाणी उपसा संस्थांना मंजुरी आहे, यामध्ये नव्याने भर टाकणार्‍या नळ पाणी पुरवठ्याच्या योजना मधील पिंपळगाव, दापोडी, राहू आणि परिसरातील गावे यांना उद्भव निर्माण करण्यात येत आहे..

पूर्वी या तलावातून होणार्‍या सिंचनाचा भाग आणि होणारा उपसा तसेच या तलावांना कालव्या द्वारे भरण्यात येणार्‍या खडकवासला धरणातील पाण्याचा साठा या सर्वांचा व्यवस्थित मेळ घातल्यास या योजना काही वर्ष व्यवस्थित चालू शकतील आणि
नंतर ते बंद पडतील याबद्दल कोणालाही शंका वाटणार नाही. पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येला पिण्याचे पाणी राखीव ठेवून उरलेले पाणी दौंड तालुक्यातील व्हिक्टोरिया आणि माटोबा तलावाकडे पाठवण्यात येणार असून यामध्ये दौंड शहरातील पिण्याच्या पाण्यासाठी असलेला 26. 26 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा ही राखीव असतो.

सध्या चाललेल्या योजना या शुद्धी पाण्याच्या असून एक लिटर शुद्ध पाणी करण्यासाठी तीन लिटर पाणी वाया जाते परिणामी गावकर्‍यांसाठी या योजनेतील आलेल्या पाण्याच्या साठ्यापैकी प्रति लिटर तीन लिटर पाणी वाया घालून एक लिटर स्वच्छ पाणी घ्यावे लागणार आहे, हे पाणी उपसण्यासाठी लागणारी यंत्रणा विद्युत मोटार आणि तिचा वीज बिलाचा खर्च हा मोठा असणार आहे. भविष्यकाळात काही ग्रामपंचायतीला तो भरणे अवघड होणार आहे मागील काळातील झालेल्या काही पाणी योजना केवळ वीज बिल भरले नसल्याने बंद पडलेल्या आहेत.

अनेक ठिकाणी पाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प उभारण्यासाठी जागा हा अडचणीचा विषय झालेला आहे, तर काही ठिकाणी टाक्यांसाठी असणारी जागा अडचणीत आलेली आहे. गावातील राजकीय वातावरणामध्ये हे प्रश्न गुरफटलेले गेले असल्याने याच्यावरती उपाययोजना काम सुरू होतानाच करणे अपेक्षित होतं ते घडलेले नाही परिणामी.जागा या विषयावर काही योजंनांची कामे सुरूच झालेली नाहीत.
शिरापूर कडेठाण येथील जागेचा प्रश्न बराच वादाचा झालेला होता. बोरीपार्धीतील योजनेचे काम ठेकेदार बंद करून निघून
गेलेला आहे.

Back to top button