पुण्यातील कचरा पुन्हा दौंडमधील भांडगावात | पुढारी

पुण्यातील कचरा पुन्हा दौंडमधील भांडगावात

केडगाव : पुढारी वृत्तसेवा :  पुणे शहराचा कचरा आता दौंड तालुक्यातील भांडगाव येथे रिचवण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. रोज 40 टन कचरा येथे टाकला जात आहे. दै ‘पुढारी’ने याबाबत मागील काही दिवसांपूर्वी लक्ष वेधले असता हा प्रकार बंद झाला होता, तो परत जोमाने सुरू झाला आहे. पुण्याच्या कचरा डेपोसारखा हा परिसर दिसू लागला आहे. उग्र दुर्गंधी, माश्या आणि इतर चिलटांनी या परिसरात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली असताना ग्रामपंचायतीला याबाबत कोणतीच माहिती नसल्याचे समजले आहे. सरपंच लक्ष्मण काटकर यांना विचारले असता ते म्हणाले, आम्ही तत्काळ आरोग्य विभागाला पत्र देऊन याबाबत कारवाई करावी, अशी विंनती करू.
या ठिकाणी रोज दहापेक्षा अधिक हायवा गाड्या भरून कचरा येतो आणि विरळ लोकवस्ती असलेल्या भांडगावच्या दगडखाण परिसरातील उजाड माळानावर टाकला जात आहे. सध्या या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांच्या वावर या कचर्‍याच्या ढिगावर दिसत आहे. या भागात ग्रामस्थांना जाणे-येणे अवघड झालेले आहे.

गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पुणे महानगरपालिकेच्या घोले रोड विभागातील कचरा गाडी क्रमांक 356 मधून कचरा खाली करण्यासाठी चाललेला होता. या वेळी इकडे कुठे? असे चालकाला विचारल्यास शेतकर्‍यांच्या मागणीवरून आणला आहे, असे त्याने सांगितले. मात्र शेतकर्‍याचे नाव, त्याचा मागणी अर्ज, याबाबत तो काहीच उत्तर देऊ शकला नाही. हा कचरा फुकट आणून देतात, अशी माहिती मिळाली आहे.

या कचरागाड्यांना पुणे ते भांडगाव आणि परत हा सुमारे 117 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठी या वाहनांना साधारण 4000 रुपयांचे डिझेल एका गाडीला लागत असावे. दिवसभरात दहा गाड्या धरल्या तरी जवळपास चाळीस हजार रुपयांचे फक्त डिझेल लागते. चालक पगार, कचरा भरणे, खाली करणे, यावरील खर्च वेगळाच असतो. रोज असा जवळपास 50 हजार रुपयांचा खर्च करून दौंड तालुक्यातील शेतकर्‍यांच्या कल्याणाची ओढ पुण्यातील कोणाला लागली आहे, हे काही कळत नाही; तसेच शेतकरी कल्याणाचा खर्च पुणे महापालिका कोणत्या अर्थशीर्षकातून करीत आहे, याचाही खुलासा होत नाही.

आरोग्य विभाग म्हणतोय : आम्ही काय करू?
दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये कचरा पुणे महानगरपालिकेकडून आणून खाली केला जात आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी उज्ज्वला जाधव आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांना दूरध्वनीवरून दिली असता, आम्ही काय करणार आहोत? याबाबत तुम्ही ग्रामपंचायतीला कळवा. तुम्हीच ते सगळे पाहायला पाहिजे, अशी भाषा वापरून आरोग्याच्या दृष्टीने या घातक कचर्‍याविषयी त्यांच्याकडून निष्काळजीपणाची उत्तरे ऐकण्यास मिळालेली आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन देसाई यांनी तर याबाबत आम्ही काहीच करू शकत नाही, असे स्पष्टपणे सांगितले.

Back to top button