खरेदी विक्री संघाची निवडणूक : ‘त्या’ तीन जणांचे अर्ज अखेर ठरले वैध | पुढारी

खरेदी विक्री संघाची निवडणूक : ‘त्या’ तीन जणांचे अर्ज अखेर ठरले वैध

वडगाव मावळ : मावळ तालुका खरेदी-विक्री सहकारी संघाच्या निवडणूकप्रक्रियेत झालेल्या छाननीमध्ये बाद ठरविण्यात आलेले ‘त्या’ तीन उमेदवारांचे अर्ज अखेर वैध ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे बिनविरोध होण्याच्या मार्गावर असलेल्या दोन उमेदवारांना निवडणुकीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, अर्ज बाद झालेल्या उमेदवारांनी न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली होती. या पार्श्वभूमीवर महायुतीतील प्रमुख नेते व पदाधिकार्‍यांनी सहायक निवंधक सर्जेराव कांदळकर यांची भेट घेऊन संबंधित अर्जांची पुन्हा तपासणी करून ते मंजूर करावेत, अशी मागणी केली होती.

यावर सहायक निबंधक कांदळकर यांनी दि. 6 रोजी पुन्हा सुनावणी घेतली व दि. 7 रोजी यावर संबंधित बाद ठरविण्यात आलेले अर्ज मंजूर करत असल्याचा आदेश दिला. त्यामुळे अ वर्ग टाकवे गटातील बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झालेले शांताराम लष्करी व भटक्या विमुक्त जाती गटातील बिनविरोधचा मार्ग मोकळा झालेले दत्तात्रय गिरिगोसावी यांना आता निवडणुकीचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

94 उमेदवारीअर्ज दाखल

संस्थेच्या निवडणुकीसाठी 94 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी अ वर्ग मतदारसंघातील टाकवे गटात दाखल झालेल्या तीन अर्जांपैकी शिवाजी असवले व प्रकाश देशमुख यांचे अर्ज छाननीमध्ये बाद ठरविण्यात आले होते. त्यामुळे या गटातील शांताराम लष्करी यांचा बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. तसेच, भटक्या विमुक्त जाती गटातील दाखल झालेल्या दोन अर्जांपैकी शरद नखाते यांचा अर्ज छाननीमध्ये बाद झाला होता. त्यामुळे दत्तात्रय गिरीगोसावी यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

हेही वाचा

Back to top button