धक्कादायक : मावळात शिष्यवृत्तीच्या सराव परीक्षेतही फिक्सिंग?

धक्कादायक : मावळात शिष्यवृत्तीच्या सराव परीक्षेतही फिक्सिंग?

वडगाव मावळ : पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा कस लागणारी व गुणवत्ता पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणार्‍या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात घेतल्या गेलेल्या सराव परीक्षेतही शिक्षकांकडून फिक्सिंग झाल्याचा प्रकार काही जिल्हा परिषद शाळांमध्ये घडला असून, अशीच स्थिती मूळ परीक्षेतही राहिली तर खर्‍या गुणवत्ता पूर्ण विद्यार्थ्याच्या दृष्टीने हे घातक ठरणार आहे.

तीन वर्षांपूर्वी 65 शाळांचा निकाल शून्य टक्के

प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता ज्या परीक्षेत समजते त्या शिष्यवृत्ती परीक्षेत मावळ तालुक्यात तीन वर्षांपूर्वी तब्बल 65 जिल्हा परिषद शाळांचा निकाल शून्य टक्के लागला होता. त्यामुळे गुणवत्ता पात्र तर नाहीच पण 65 शाळांमधील एकही विद्यार्थी साधा पासही झाला नव्हता. इतकी वाईट अवस्था होती. या संदर्भात दैनिक पुढारीने सविस्तर वृत्तमालिका प्रसिद्ध करून तालुक्यातील शिक्षण विभागाला जाग आणली होती.

त्यानंतर, खडबडून जागे झालेल्या शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल चांगला कसा येईल याकडे लक्ष केंद्रित करून विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. याचा परिणाम म्हणून लगेच दुसर्‍या वर्षी शून्य टक्क्यांच्या शाळांमध्ये कमालीची घट होऊन ही संख्या 11 वर आली होती. तर, गतवर्षी फक्त 6 शाळा शून्य टक्क्यांवर होत्या. एकंदर गेल्या दोन वर्षांत शाळेचा निकाल सुधारला असला तरी यामागे परीक्षेत होणारे फिक्सिंग कारणीभूत असल्याची चर्चा शिक्षक वर्गातच दबक्या आवाजात सुरू आहे.

18 फेब्रुवारीला होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पारदर्शक व्हावी..

पाचवी व आठवी इयत्तेतील विद्यार्थ्यांची होणारी शिष्यवृत्ती परीक्षा ही 18 फेब्रुवारीला होणार आहे. किमान ही मुख्य परीक्षा तरी पारदर्शक व्हावी, अशी अपेक्षा प्रामाणिक प्रयत्न करणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांनी व संबंधित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांकडून केली जात आहे.

विद्यार्थ्यांचेच मोठे नुकसान होण्याची शक्यता

दरम्यान, या फिक्सिंग प्रकारचा अनुभव नुकत्याच झालेल्या सराव परीक्षेतही अनुभवायला मिळाला. पवन मावळ भागातील एका परीक्षा केंद्रावर शिक्षकच विद्यार्थ्यांना उत्तरे सांगत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे हा प्रकार खरंच झाला असेल तर सराव परीक्षेत ही परिस्थिती असल्यास शिष्यवृत्तीच्या मूळ परीक्षेत काय होईल हा प्रश्नच आहे. केवळ शाळेचा निकाल शून्य टक्के लागू नये किंवा फक्त विद्यार्थी पास व्हावेत, या अपेक्षेने शिक्षकच विद्यार्थ्यांना उत्तरे सांगत असतील, तर यामध्ये विद्यार्थ्यांचेच मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता पात्र व्हावेत, या दृष्टीने शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आले आहे. वेळोवेळी सराव परीक्षाही घेण्यात आल्या आहेत. यामध्ये काही शिक्षकांकडून चुकीच्या पद्धतीने कार्यवाही होत असेल तर अशा शिक्षकांना पाठीशीही घातले जाणार नाही.

– सुदाम वाळुंज, गट शिक्षणाधिकारी मावळ

जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठलेही साधनसामग्री नसताना प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षेची तयारी करत असतात. परंतु, अशा काही शिक्षकांच्या चुकीच्या पद्धतीमुळे ग्रामीण भागातील प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. अशा चुकीच्या प्रकारांवर आळा घालणे आवश्यक आहे.

– ज्ञानेश्वर सुतार, आढे

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news