माघ यात्रेनिमित्त उद्यापासून मयूरेश्वर द्वारयात्रेला सुरुवात | पुढारी

माघ यात्रेनिमित्त उद्यापासून मयूरेश्वर द्वारयात्रेला सुरुवात

मोरगाव : पुढारी वृत्तसेवा : अष्टविनायकांचे आद्य तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथे माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध पंचमी म्हणजे दि. 10 ते 14 फेब्रुवारीपर्यंत द्वारयात्रा व श्रींचे मुक्तद्वार दर्शन व जलस्नान याकरिता गाभारा खुला करण्यात येत आहे. यादरम्यान भाविकांना श्रीमयूरेश्वराच्या माघ यात्रा पर्वकाळ पहाटे ते दुपारी 12 पर्यंत मूर्तीला जलाभिषेक व दूर्वा अर्पण करता येणार आहेत, अशी माहिती देवस्थानचे व्यवस्थापक राजेंद्र जगताप यांनी व कर्मचारी मुकुंद वाघ यांनी दिली.

देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीने उत्सवाची तयारी सुरू आहे. महान साधू मोरया गोसावी यांना गणेशकुंडात प्राप्त झालेली श्री मंगलमूर्तीची पालखी मोरगाव मुक्कामी सोमवारी (दि. 12) येत आहे. तिचे प्रस्थान गुरुवारी दि. 15 फेब्रुवारी रोजी होत आहे. सलग 5 दिवस श्रींचे मुक्तद्वार दर्शन व जलाभिषेक करण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. मोरगावच्या चारदिशा द्वार यात्रा शनिवार (दि. 10) ते बुधवार (दि. 14) पर्यंत होत असून, श्रींना रत्नजडीत अलंकारांसह आकर्षक पोशाख परिधान केला जाणार आहे. श्रींची छबिना पालखी, श्री मयूरेश्वरापुढे धुपारती, महापूजा, महानैवेद्य, मंत्रपुष्पांजली, वसंतोत्सव आदी विविध धार्मिक विधी पुजारी, गुरव व ब्रह्मवृंदामार्फत करण्यात येणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या वतीने गणेशकुंड स्वच्छ करण्यात आले आहे. सुपा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार मोरगाव पोलिस मदत केंद्राकडून बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.

Back to top button