खुद्द बारामतीतच सुप्रिया सुळे यांची वाट खडतर | पुढारी

खुद्द बारामतीतच सुप्रिया सुळे यांची वाट खडतर

राजेंद्र गलांडे

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसमधील  फुटीनंतर आता पक्ष आणि चिन्हही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडे गेल्याने बारामतीच्या ‘होमपिच’वरच खासदार सुप्रिया सुळे यांची वाट अधिक खडतर झाली आहे. 2019 च्या निवडणुकीत बारामतीनेच त्यांना 1 लाख 28 हजारांचे प्रचंड मताधिक्य दिले होते. त्या जोरावर त्या लोकसभेत तिसर्‍यांदा गेल्या होत्या. आता खुद्द अजित पवार यांनीच मी सांगेन त्याच उमेदवाराच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन बारामतीकरांना केल्याने सुळे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यानंतर 2009 पासून खासदार सुळे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. सन 2009 मध्ये त्यांची निवडणूक एकतर्फी झाली. परंतु 2014 च्या मोदी लाटेत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी त्यांना जेरीस आणले. अवघ्या 69 हजारांच्या फरकाने जानकर हे पराभूत झाले. सन 2019 ला भाजपने पुन्हा या मतदारसंघात पूर्ण ताकद लावत दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या पत्नी, बारामती माहेर असणार्‍या कांचन कुल यांना मैदानात उतरवले. सुळे यांनी त्यांचा 1 लाख 55 हजारांनी पराभव केला. त्यात एकट्या बारामतीच्या 1 लाख 28 हजार मताधिक्याचा मोठा वाटा होता. अर्थात, हे मताधिक्य मिळाले ते अजित पवार यांनी निवडणूक यंत्रणा हातात घेतल्यामुळे. सुळे यांची जागा अडचणीत आल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादीने त्या वेळी बारामतीत प्रचंड ताकद लावली. अन्य तालुक्यांत दगाफटका झाला तरी जागा जाऊ नये, असे नियोजन करण्यात आले. घडलेही तसेच. सुळे यांना इंदापूर, पुरंदर व भोर-वेल्ह्यातून काहीशी आघाडी मिळाली. पण बारामतीने एकतर्फी दिलेली साथ त्यांना विजयापर्यंत घेऊन गेली.
दादाच विरोधात गेल्याने अडचण
या निवडणुकीत बारामतीतील सर्व यंत्रणा एकहाती हाताळणारे अजित पवार यांनीच सुळे यांच्या  विरोधात रणशिंग फुंकले आहे. काका शरद पवार यांच्या ताब्यातून पक्ष त्यांनी आपल्याकडे घेतला आहे, शिवाय ’लोकसभेला मिठाचा खडा लागला तर मी विधानसभेला वेगळा विचार करेन’, अशी तंबीच बारामतीकरांना दिली आहे. परिणामी, सुळे यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. बारामतीत दादांचा एकछत्री अंमल आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गेली अडीच दशके येथून काढलेले लक्ष आणि तीनवेळा खासदार झाल्यानंतरही सुळे यांनी स्वतःच्या तालुक्यात कार्यकर्त्यांची न बांधलेली मोट या बाबी आता त्यांनाच प्रचंड अडचणीच्या ठरत आहेत. शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर कमालीचा विश्वास दाखवला. तालुक्यासह जिल्हा व राज्याची सूत्रे त्यांच्या हाती दिली. त्यामुळे बारामतीत काही घडले आणि शरद पवार यांच्याकडे गेले की ‘तुम्ही अजितला भेटा, मी बघत नाही’, अशी उत्तरे त्यांच्याकडून दिली जात होती. परिणामी, साहेबांकडील लोंढा दादांकडे गेला. कामे दादांकडूनच मार्गी लागत असल्याने आणि साहेब अंतिमतः दादांकडेच पाठवत असल्याने पुढे लोक शरद पवारांकडे  फक्त भेटीगाठी साठीच जाऊ लागले.
कल्पनाच न केलेली स्थिती आली समोर
बारामती विधानसभा  मतदारसंघात सुळे यांनी आपला स्वतःचा गट  आजवर बांधला नाही. राजकारणात अशी वेळ येईल याची कल्पनाच त्यांनी केलेली नसावी, अन्यथा तीनवेळा खासदारकी मिळाल्यानंतर त्यांना स्वतःचा गट बांधणे अशक्य नव्हते.

बारामतीचा विषय आला की ताई आजवर ’माझा दादा खंबीर आहे, दादामुळे मला चिंता नाही’, असे बोलत असायच्या. आता ऐनवेळी दादाने त्यांचा हात सोडल्याने गटांगळ्या खाण्याची वेळ त्यांच्यावर इथे आली आहे. बारामतीत सर्व सहकारी संस्था, कारखाने, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद-पंचायत समितीचे पदाधिकारी सदस्यांपासून ते नगरपरिषद सर्व संस्था अजित पवार यांच्याकडे आहेत. बारामतीला विकसित बनविण्यात त्यांचे योगदान सगळेच मान्य करतात. आता तर बाह्या सरसावून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर थेट टीका करू लागले आहेत. त्यामुळे ही जागा त्यांनी प्रतिष्ठेची केलेली दिसून येते. त्यामुळे आत्तापासूनच ते पूर्ण ताकदीने बांधणी करत आहेत.

भाजप पदाधिकार्‍यांची गोची
अजित पवार हे महायुतीत सहभागी झाल्याने साहजिकच शिंदे गट व भाजपला त्यांच्यासोबत जावे लागेल. बारामतीत भाजपची थोडी फार ताकद निर्माण होऊ लागली होती. परंतु खुद्द अजित पवार तिकडे गेल्याने येथील भाजप पदाधिकार्‍यांची मोठी गोची झाली आहे. पवार विरोध हाच त्यांचा आजवरचा अजेंडा होता. आता युती धर्म पाळण्यासाठी त्यांना अजित पवारांचेच काम करावे लागेल. त्यांनी मनापासून साथ दिली नाही तरीही पवार यांना फार धक्का बसेल, अशी स्थिती इथे नाही. शिंदे गट कार्यरत असला, तरी त्यांची फारशी ताकद नाही.महायुतीच्या विरोधात इथे इंडिया आघाडीकडून सुप्रिया सुळे लढतील. बारामतीत काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) यांची ताकद नगण्यच आहे. त्यामुळे सुळेंचा मार्ग अधिकच खडतर आहे.

Back to top button