…तर भाजप ग्रामपंचायतही जिंकणार नाही : खासदार संजय राऊत | पुढारी

...तर भाजप ग्रामपंचायतही जिंकणार नाही : खासदार संजय राऊत

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  भारतीय जनता पक्षाला निवडणुकांमध्ये मिळालेले यश हे त्यांच्या पक्षाचे नाही, तर त्यांनी ईव्हीएम मशिनमध्ये केलेल्या घोटाळ्याचे यश आहे. ईव्हीएमचा पूर्वी मीसुद्धा समर्थक होतो. परंतु, मध्य प्रदेशमध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर माझी खात्री पटली आहे की, ईव्हीएममध्ये भारतीय जनता पक्षाने निश्चितच घोटाळा केला आहे. ईव्हीएम नसेल तर भाजप देशांमधील एकही ग्रामपंचायत निवडणूक जिंकू शकत नाही, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे नऱ्हेतील संस्थेच्या सभागृहात आयोजित केलेल्या सातव्या युवा संसदेमध्ये बोलत होते. या वेळी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष व युवा संसदेचे अध्यक्ष अ‍ॅड. शार्दूल जाधवर उपस्थित होते.

राऊत म्हणाले, राजकारण करायचे असेल तर मनामध्ये भीती बाळगून चालत नाही. राजकारणामध्ये विरोधकांचाही सन्मान केला पाहिजे, ही शिकवण बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला दिली. परंतु, सध्या मात्र विरोधकांना संपविण्याचे कटकारस्थान महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात सुरू आहे. संसदेमध्ये गेल्या 22 वर्षांपासून मी खासदार म्हणून काम करीत आहे. परंतु, गेल्या दहा वर्षांमध्ये संसद लोकशाहीचे मंदिर राहिलेले नाही, तर त्या ठिकाणी केवळ आरडाओरडा करून एकमेकांचे गळे दाबण्याचे आणि लोकशाही संपविण्याचे काम सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.

आरक्षण मुद्द्यावर केवळ फसवणूक
महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या अनागोंदी कारभार सुरू आहे. एका मंत्र्याने मराठ्यांची बाजू घ्यायची, दुसर्‍या मंत्र्याने ओबीसीची बाजू घ्यायची, अशा प्रकारची नौटंकी सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणतीही ठोस भूमिका न घेता केवळ मराठ्यांचीच नव्हे तर ओबीसींची फसवणूक करीत असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी या वेळी केला.

Back to top button