अजून कितीदा फसवणार..! आजीबाईंकडून खासदार सुळे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती | पुढारी

अजून कितीदा फसवणार..! आजीबाईंकडून खासदार सुळे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  जनाई-शिरसाई योजनेच्या पाण्यासाठी सुपे (ता. बारामती) येथे सुरू असलेल्या उपोषणाला खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी (दि. 26) भेट दिली. या वेळी एका आजीबाईंनी खा. सुप्रिया सुळे यांचा चांगलाच समाचार घेतला. अजून कितीदा आम्हाला फसवणार? असा थेट सवालच या आजीबाईंनी उपस्थित केला. जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेचे हक्काचे पाणी नियमितपणे मिळावे, यासाठी सुपे येथे प्रजासत्ताक दिनापासून शेतकर्‍यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्त्यांनी बारा मागण्या शासनाकडे ठेवल्या आहेत. दरम्यान, या उपोषणाला खासदार सुळे यांनी भेट दिली. त्या वेळी एका आजीबाईंनी त्यांना चांगलेच सुनावले. ‘पाणी कधी देणार? अजून किती फसवणार?’ असे सवाल या आजीबाईंनी खा. सुळे यांना विचारले.

याशिवाय त्यांनी खा. सुळे यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीच केली. ‘विचार करा आमचा गरिबांचा, शेतकर्‍यांचा. कितीदा फसवायचे झाले, आज पाणी येईल.. उद्या पाणी येईल… परवा पाणी येईल… पाणी का येत नाही? हे आम्हाला सांगा. तुम्हाला आम्ही फसवल्यावर कसे होईल? तुम्ही वरच्या हुद्द्यावर कसे जाता? मोठे कसे होता? आम्ही तुम्हाला मोठे केले आहे आणि तुम्ही आम्हाला फसवता होय. आम्हाला पाणी मिळालेच पाहिजे,’ अशा शब्दांत आजीबाईंनी या वेळी प्रश्नांची सरबत्ती करीत आपला संताप व्यक्त केला.
वर्षानुवर्षे हा भाग पाण्यासाठी टाहो फोडतो आहे. त्यामुळे आता लोकांचा संताप अनावर होऊ लागला आहे.

दोन्ही गटांत चढाओढ सुरू
बारामतीच्या दुष्काळी भागातील जनतेसाठी आता राष्ट्रवादीचे दोन्ही गट धावून जात असल्याची स्थिती पाहायला मिळते आहे. सुप्यातील उपोषणस्थळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भेट दिली. पाणी प्रश्नावरून ’ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार’ असा सामना येथे रंगताना पाहायला मिळतो आहे. माझ्या सहीने योजना मार्गी लागल्याचे शरद पवार म्हणाले होते, तर मंत्रालयात या, कोणाच्या सहीने योजना झाली ते दाखवतो, असे प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिले होते. आता उपोषणानिमित्त ही चढाओढ पुन्हा एकदा दिसून येत आहे.

 

Back to top button