ढगाळ हवामानामुळे कांद्याला फटका : शेतकरी मेटाकुटीला | पुढारी

ढगाळ हवामानामुळे कांद्याला फटका : शेतकरी मेटाकुटीला

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : सध्या ढगाळ हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील अणे-माळशेजच्या उत्तर भागातील कांदा पिकावर मावा, करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महागड्या कीटकनाशकांची फवारणी करण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसू लागला आहे.

सध्या महागाईत भरमसाठ वाढ झाली असल्याने रासायनिक खते, कीटकनाशकांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यात लहरी हवामानामुळे शेतकर्‍यांच्या अडचणीत वाढ होत आहे. जुन्नर तालुक्यातील ओतूर, रोहोकडी, फापाळे शिवार, आंबेगव्हाण, पाचघर, उदापूर, डिंगोरे, अहिनवेवाडी परिसर चांगल्या प्रतीचा कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. मात्र मागील 15 दिवसांपासून ढगाळ वातावरण, दाट धुके निर्माण होत असल्याने कांद्यावर मावा, करपा रोगांचा प्रादूर्भाव वाढला आहे.

त्यामुळे शेतकर्‍यांनी कीटकनाशकांची फवारणी सुरु केली आहे. बदलत्या हवामानामुळे उत्पादनातील घट, रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणीचा वारेमाप खर्च आणि कोसळलेले बाजारभाव यामध्ये शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. पुढील काळात कांद्याला कसा बाजारभाव मिळतो, हे माहीत नसले तरी सध्या शेतकरी आशावादी राहून आपल्या शेतामध्ये राबराब कष्ट करताना दिसत आहेत. सध्या ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने कांद्यावर मावा, करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकर्‍यांच्या मागे संकटांची मालिका सुरूच आहे. परंतु शासन त्यावर ठोस मार्ग काढत नाही, अशी खंत ओतूर येथील शेतकरी पप्पू तांबे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा

Back to top button