दुर्दैवी : भूगाव येथील दोन चिमुकल्यांचा तळ्यात बुडून मृत्यू | पुढारी

दुर्दैवी : भूगाव येथील दोन चिमुकल्यांचा तळ्यात बुडून मृत्यू

पौड : पुढारी वृत्तसेवा : भूगाव येथील फॉरेस्ट ट्रेल्स लेबर कॅम्प येथे असलेल्या पाण्याच्या तळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 15) दुपारच्या सुमारास घडली.भूगाव येथील माताळवाडी फाटा येथे फॉरेस्ट ट्रेल्स हा प्रकल्प आहे. येथे असलेल्या लेबर कॅम्प येथे छोटासे तळे आहे. याठिकाणी सोमवारी दुपारी तीन वाजता सम्राट विक्रांत पोटफोडे (वय 11) आणि अर्पित गौतम (वय 12) हे गेले होते.  दोघेही त्या तळ्यात बुडाले.
या दोघांना येथील कामगारांनी पुणे येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचे शवविच्छेदन ससून याठिकाणी करण्यात आले. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह पौड पोलिस स्टेशन येथे आणण्यात आले होतो. दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिल्यानंतर अंत्यविधीसाठी मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आले.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

या ठिकाणी कायद्याची पायमल्ली करून सर्व नियम पायदळी तुडविण्यात आलेले आहेत. याच कारणाने कामगारांच्या निष्पाप बालकांचा मृत्यू झाला असून संबंधितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पौडचे पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्याकडे वंचितचे पुणे शहर उपाध्यक्ष अजय भालशंकर यांनी केली आहे. या वेळी वंचित माथाडी जनरल ट्रान्सपोर्ट अध्यक्ष विशाल कसबे, विशाल सरोदे, अक्षय गोटेगावकर, दत्ता शेंडगे, राहुल वाघमारे, विजय मोघे, लक्ष्मीताई कांबळे तसेच मृताचे नातेवाईक उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button