IPL 2024 : यंदाचे आयपीएल दाेन टप्‍प्‍यात? जाणून घ्या संभाव्य वेळापत्रक | पुढारी

IPL 2024 : यंदाचे आयपीएल दाेन टप्‍प्‍यात? जाणून घ्या संभाव्य वेळापत्रक

पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्वांच्या नजरा यंदाच्‍या हंगामातील आयपीएल सामन्‍यांकडे लागल्या आहेत, मात्र लीगचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष अरुण सिंग धुमल यांनी ‘अमर उजाला’ला दिलेल्या माहितीनुसार यावेळी आयपीएलचे वेळापत्रक एकाचवेळी जाहीर होणार नाही तर ते टप्प्याटप्प्याने जाहीर केले जाणार आहे. आयपीएल आणि सार्वत्रिक निवडणुकांमुळे असे नियाोजन करावे लागत आहे. यंदा निवडणुकांमुळे आयपीएल दाेन टप्‍प्‍यात आयोजित करावे लागणार आहे. (IPL 2024)

विश्वचषकाच्या एक आठवडाआधी अंतिम सामना होणे महत्वाचे

धुमल म्हणतात की, सध्या आयपीएल आणि महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) च्या तयारीवर काम सुरू आहे. डब्ल्यूपीएल फेब्रुवारीच्या मध्यापासून ते 10 मार्चपर्यंत सुरू होईल, तर आयपीएल 21, 22 मार्चपासून सुरू होईल आणि 25, 26 मे पर्यंत संपेल. जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक सुरू होत आहे. भारताचा सामना ४ जूनला आहे. याच्या आठवडाभर आधी आयपीएल संपवण्याचा प्रयत्न असेल. यावेळी आव्हान आहे की, देशात सार्वत्रिक निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक एकाच वेळी जाहीर करणे शक्य होणार नाही. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर अनेक गोष्टी अवलंबून असतील. (IPL 2024)

उद्घाटन आणि समारोप समारंभही होणार

आमची टीम केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाशी सातत्याने चर्चा करत असल्याचे धुमल यांनी सांगितले. त्यानुसार आम्ही काम करत आहोत. आम्ही लवकरच मार्च ते एप्रिल दरम्यान पहिल्या टप्प्याची घोषणा करू. त्यानंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर उर्वरित राज्यांमध्ये आयपीएल कशी आयोजित करायची याचा निर्णय घेऊ. आयपीएलचे उद्घाटन आणि समारोप समारंभही आयोजित केले जातील, असेही त्‍यांनी सांगितले.,  (IPL 2024)

आयपीएल भारतातचं

आयपीएल परदेशात नेण्याचा आमचा प्रयत्न नाही. सामने देशातच व्‍हावेत, सरकारलाही तेच हवे आहे. शासनाशी समन्वय साधून येथे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. लीग आयोजित करण्याच्या मंजुरीसाठी आमची टीम गृह मंत्रालय आणि राज्य सरकारांशी बोलत आहे. त्यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आम्ही पुढील वेळापत्रक ठरवू.

तर डबल हेडरची संख्या वाढणार

धुमल म्हणतात की, लीगच्या डबल हेडरची संख्या (एका दिवसात दोन सामने) वाढण्याची अपेक्षा आहे. कोणत्या राज्यात निवडणुका कधी होणार हे पाहणे बाकी आहे.  लीगचे सामने रखडले तर डबल हेडरची संख्या वाढू शकते. पूर्वी जितके दुहेरी हेडर होते तितकेच असावेत असा आमचा प्रयत्न असेल.

WPL जगातील सर्वात मोठी महिला लीग

डब्ल्यूपीएलचे शेवटचे आयोजन मुंबईत झाले होते, परंतु यावेळी फ्रँचायझी आणि चाहते लक्षात घेऊन बंगळुरू आणि दिल्ली या दोन शहरांमध्ये त्याचे आयोजन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही गेल्या वर्षी महिला प्रीमियर लीग सुरू केली, परंतु लीगला चाहते आणि फ्रँचायझींकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे ती जगातील मोठी महिला लीग बनली आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.

जगातील इतर क्रिकेट मंडळांतील क्रिकेटपटूंनाही त्यात सामील व्हायचे आहे. ही मोठी गोष्ट आहे. या लीगनंतर आपल्या राज्यातील अकादमींमध्ये महिला क्रिकेटची मागणी अचानक वाढली आहे. मोठ्या संख्येने मुली तिथे क्रिकेट खेळण्यासाठी येत आहेत. अकादमीत पालक मोठ्या संख्येने आपल्या मुलींसह येत आहेत, अशीही माहिती त्‍यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button