Ajit Pawar : …अशा लोकांना ओवाळून टाकले पाहिजे: अजित पवारांचा शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना टोला | पुढारी

Ajit Pawar : ...अशा लोकांना ओवाळून टाकले पाहिजे: अजित पवारांचा शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना टोला

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती शहर, तालुक्याचा विकास कोणी केला ? यातील अनेकांना मी मोठे केले, त्यांना पदे दिली, मानसन्मान दिला. हे लोक कोणाला माहित पण नव्हते. त्यातील अनेकांनी माझ्या तरुणपणात माझ्यासोबत काम केले आहे. पण आता ते गावोगावी घोंगडी बैठका घेत आहेत. मी कोणाला काय बोललो की, बघा कसा बोलतो, असे म्हणत आहेत, असे लोक ओवाळून टाकले पाहिजेत, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना लगावला. Ajit Pawar
बारामतीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी पवार म्हणाले, एका जमिनीच्या विषयासंबंधी माझी आई कोर्टात गेली होती. तिने तेथील अस्वच्छता पाहिली. त्यानंतर मला सांगितले की, तु बारामतीचा आमदार आहेस, स्वच्छतेबाबत तुझे कौतुक होते, पण जरा कोर्टात जावून अवस्था पहा. त्यावर मी त्रयस्थ व्यक्तीला तेथे जाऊन पाहणी करायला सांगितले होते. मी मागे कोर्टात गेलो होतो, पण तेथील न्याय व्यवस्थेला ते आवडले नव्हते. त्यांनी नाराजी व्यक्त केल्याने मी यावेळी त्यांच्या क्षेत्रातील एका मान्यवराला सांगून तेथील कामे पूर्णत्वाला नेतो, असा शब्द दिला. मी तेथे राज्य शासनाच्या माध्यमातून रंगरंगोटी, लॅण्डस्केपिंग करून देतो, असे सांगितले. बारामतीच्या नागरिकांना कोर्टात गेल्यावर जर स्वच्छ वाटत नसेल. तर तो आमचा आणि बारामतीकरांचा कमीपणा असल्याचे देखील पवार म्हणाले.

Ajit Pawar : चॅलेंज आहे

मी बारामतीचा आमदार म्हणून जेवढे काम करतो, तेवढे कोणीच करू शकत नाही. हे माझे चॅलेंज आहे. उगाच फुशारक्या मारत नाही, असे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मी रोज पाचला उठतोय, सकाळी सहाला काम करतोय, जेवायला वेळ मिळत नाही, अशी स्थिती आहे. आजची बारामती कोणी उभी केली, हे सगळ्यांना माहित आहे.

कांदा निर्यातीबाबत पंतप्रधानांशी चर्चा

राज्यात दूधाचे दर कोसळले. तेथे राज्य शासनाने पाच रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याची भूमिका घेतली. आता सोयाबीन, ज्वारीचे दर पडले आहेत. कांदा निर्यात बंदीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत शुक्रवारी (दि. १२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील दौऱ्यावेळी त्यांच्याशी बोललो असल्याचे पवार यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे, नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय उभे केले जाणार आहे. त्या ठिकाणी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवल्या जाणार असल्याची माहिती पवार यांनी यावेळी दिली.

हेही वाचा 

Back to top button