Maharashtra Politics : ‘केंद्रात भाजप सत्तेत न आल्यास अजित पवार गटाचे आमदार परतणार’ | पुढारी

Maharashtra Politics : 'केंद्रात भाजप सत्तेत न आल्यास अजित पवार गटाचे आमदार परतणार'

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदारांमध्ये आता वरून जरी अस्वस्थता दिसत नसली तरी त्यांच्या मनात शंभर टक्के अस्वस्थता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जर केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आले नाहीतर अजितदादा गटातील आमदार विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटात येतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते व माजी मंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.

खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘टू द पॉईंट’ या कार्यक्रमात बोलताना राजेश टोपे यांनी हा दावा केला आहे. भाजपचे सरकार गेल्यास पवार साहेबांची माफी मागून पक्षात परत जाऊ, असे हे आमदार बोलत आहेत, असे टोपे यांनी या मुलाखतीत सांगितले. टोपे यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना आमदार अपात्रतेचा निकालही येत्या १० जानेवारी जाहीर केला जाणार आहे. त्या निकालाकडेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे लक्ष आहे. कारण शिंदे अपात्र ठरले तर भविष्यात ते ही अपात्र ठरू शकतात, याची भीतीही त्यांना आहे.

मात्र अजित पवार गटाने टोपेंचा दावा फेटाळला आहे. भविष्यात शरद पवारच अजित दादांना पाठिंबा देतील, असेप्रत्युत्तर अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी केले आहे. हा निर्णय घ्यायला कुणी भाग पाडले, हे टोपेंना माहित आहे. आता शरद पवार यांच्यासोबत विविध वयोगटातील कार्यकर्ते, नेते आहेत. त्यांना शरद पवारच कंटाळले आहेत. योग्यवेळी शरद पवार हे अजित पवारांना पाठिंबा देतील, असा दावा मिटकरी यांनी केला.

Back to top button