रावणगाव-बारामती बस अचानक रद्द; सातत्याने फेरबदल प्रवासी वैतागले | पुढारी

रावणगाव-बारामती बस अचानक रद्द; सातत्याने फेरबदल प्रवासी वैतागले

रावणगाव :- पुढारी वृत्तसेवा:  गुरुवार दि.11 रोजी संध्याकाळी बारामती-रावणगाव एसटी बसचे रावणगाव येथे आगमन झाल्यानंतर, सदर एसटी बस नेहमीप्रमाणे रावणगाव येथे मुक्कामी न थांबता रात्री 8 वाजण्याच्या सुमारास परत बारामती येथे रवाना झाली, त्यामुळे आज सकाळी 7 वाजता रावणगाव येथून सुटणारी रावणगाव-बारामती एसटी बसची फेरीसुद्धा रद्द झाली. यामुळे शुक्रवारी सकाळी रावणगाव-बारामती एसटी बसची वाट पाहणाऱ्या विद्यार्थी आणि प्रवासी यांची मोठी गैरसोय झाली.

याबाबत बारामती आगार व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही, मात्र काही ग्रामस्थ व प्रवाशांनी बारामती आगार येथे अधिक चौकशी केली असता संबंधितांना असे सांगितले की, ’सदर एसटी बस मुंबईच्या दिशेने वळविण्यात आली आहे. काही दिवसांपासून बारामती-रावणगाव एसटी बसच्या अनियमित फेऱ्यांबाबत सातत्याने तक्रारी येत असून यासंदर्भात, काही दिवसांपूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे लेखी तक्रारदेखील प्रवाशांनी व ग्रामस्थांनी केली होती, यासंदर्भात बारामती आगार व्यवस्थापकांनी ’भविष्यात बारामती-रावणगाव एसटी बसच्या फेर्‍यांबाबत वेळापत्रक पाळले जाईल!’ असे लेखी आश्वासन दिले होते तरीसुद्धा रावणगाव-बारामती एसटी बसची फेरी ऐनवेळी रद्द करण्याची घटना घडली.

बारामती-रावणगाव एसटी बस ही रावणगाव आणि परिसरातील तसेच खडकी आणि पारवडी या आडबाजूला असलेल्या गावातील ग्रामस्थ विशेषतः बारामती येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सेवा आहे. बारामती आगारास मुंबई येथे एसटी बस रवाना करायच्या होत्या तर मग इतर मार्गावरील एसटी बसच्या फेर्‍या रद्द करायच्या होत्या, दरवेळी बारामती-रावणगाव एसटी बसचाच बळी का असे अनेक जण विचारत आहेत.

हेही वाचा

Back to top button