Pune News : जिल्ह्यातील 102 अंगणवाडी कर्मचार्‍यांची हकालपट्टी | पुढारी

Pune News : जिल्ह्यातील 102 अंगणवाडी कर्मचार्‍यांची हकालपट्टी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अंगणवाडी सेविका गेल्या एक महिन्यापासून संपावर आहेत. अंगणवाडी बंद असल्याने बालकांना पोषण आहारापासून वंचित ठेवल्याचे कारण देऊन जिल्हा परिषदेने 102 अंगणवाडी कर्मचार्‍यांची हकालपट्टी केली आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा समावेश आहे. मानधनवाढ आणि सरकारी सेवेमध्ये सामावून घेण्यासंदर्भात कोणतेही आश्वासन न मिळाल्याने संप एक महिना होऊनदेखील सुरू आहे. पुण्यात विविध ठिकाणी आंदोलने करून आणि प्रशासनाला निवेदने देण्यात येत आहेत.

पण, आता प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. बालकांना पोषण आहारापासून वंचित ठेवू नये म्हणून प्रशासनाकडून इतर उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच, काही दिवसांपूर्वी रुजू झालेल्या मदतनीसांनी संप करू नये, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता. त्यानंतर आता बालकांना पोषण आहारापासून वंचित ठेवण्याचे कारण पुढे करून प्रशासनाकडून अंगणवाडी कर्मचार्‍यांना सेवा समाप्तीचे आदेश देण्यास सुरुवात केली आहे.

अंगणवाडीमार्फत किशोरवयीन मुली, गरोदर महिला, स्तनदा माता आणि शून्य ते सहा वयोगटातील बालकांना पूरक पोषण आहार, पूर्व शालेय शिक्षण, आरोग्य व पोषण शिक्षण, आरोग्य तपासणी, लसीकरण तसेच संदर्भीत सेवा पुरविण्यात येतात. त्यामुळे अंगणवाडी कामकाज दैनंदिन स्वरूपात सुरू ठेवण्यास प्रशासनाने सांगितले होते. तरीही अंगणवाडी सेविकांनी मागण्यांसाठी संप सुरूच ठेवल्याने कारवाई करण्यास सुरुवात झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शासन निर्णयानुसार बालकांना पोषण आहार मिळणे गरजेचे आहे. अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या अनुपस्थितीमुळे पोषण आहाराचा लाभार्थ्यांचा हक्क जाणीवपूर्वक दुर्लक्षित केला जात असल्याचे दिसून आले. बालकांना पोषण आहार देण्याबाबत कर्मचार्‍यांना सांगितले होते. त्यानंतरही अंगणवाडी सुरू न केल्याने सेवा समाप्तीचे आदेश देण्यास सुरुवात केली आहे.

– जे. बी. गिरासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., पुणे

हेही वाचा

 

Back to top button