‘सोमेश्वर’च्या उपाध्यक्षपदी कोणाला मिळणार संधी? | पुढारी

‘सोमेश्वर’च्या उपाध्यक्षपदी कोणाला मिळणार संधी?

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा प्रणिता खोमणे यांनी राजीनामा दिल्याने कारखान्याचा नवीन उपाध्यक्ष कोण होणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. शनिवारी (दि.6) संचालक मंडळाची बैठक होणार आहे. यात राजीनामा मंजूर होऊन पुढील उपाध्यक्ष ठरण्याची शक्यता आहे. सोमेश्वरची पंचवार्षिक निवडणूक 12 ऑक्टोबर 2021 ला झाली. अजित पवार यांनी सुरुवातीला आनंदकुमार होळकर यांना उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली होती. वर्षभराचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर गेल्या वर्षी कारखान्याच्या इतिहासात प्रथमच कोर्‍हाळे गावच्या माजी सरपंच प्रणिता खोमणे यांना उपाध्यक्षपदी संधी देण्यात आली. आता अजित पवार कोणाला संधी देतात, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

सध्याच्या संचालक मंडळातील संग्राम सोरटे, किसन तांबे, अभिजित काकडे -देशमुख, ऋषिकेश गायकवाड, शिवाजीराव राजेनिंबाळकर तर पुरंदरमधून शांताराम कापरे, विश्वास जगताप, बाळासाहेब कामथे, जितेंद्र निगडे, अनंत तांबे यांची नावे चर्चेत आहेत.

तरुणांना संधी की…
लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अजित पवार हे अनपेक्षित धक्कातंत्राचा वापर करण्याची शक्यता आहे. बारामती, पुरंदर, खंडाळा आणि फलटण या चार तालुक्यांत कार्यक्षेत्र असलेल्या सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्षपद मिळावे यासाठी इच्छुक संचालकांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. तरुण, अभ्यासू, सहकारातील जाण असलेल्या तरुण संचालकांना संधी मिळते की ज्येष्ठ संचालकांना संधी मिळणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Back to top button