Drugs Case : मावळात दोन लाखांचे ड्रग्स जप्त | पुढारी

Drugs Case : मावळात दोन लाखांचे ड्रग्स जप्त

कामशेत : ताजे व नायगाव येथे सापळा रचून तब्बल 2 लाख रुपये किमतीचे 40 ग्रॅम वजनाचे ड्रग्स पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच, तीन जणांना अटक केली आहे. रविवारी (दि. 31) रात्री सव्वादोन वाजता पोलिसांनी ही कारवाई केली. खंडू भगवान कुटे (वय 27, रा. ताजे, ता. मावळ), रोशन चंद्रकांत ओव्हाळ (वय 24, रा. नायगाव) आणि अमित भरत भानुसघरे(वय 24, रा. देवराम कॉलनी, कामशेत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस हवालदार रहिस मुलानी यांनी फिर्याद दिली आहे.

ताजे गावात टाकला छापा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ताजे व नायगाव परिसरात आरोपी हे मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ड्रग्सची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच, रविवारी रात्री ताजे परिसरात आरोपी खंडू कुटे हा दुचाकीवरुन ताजे गावाकडून पिंपळोली गावाकडे येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कुटे याला ताब्यात घेतले. झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे 90 हजार रुपये किमतीचे ड्रग्ज आढळून आले.

तसेच, लोणावळा विभागाचे सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी पथकासह नायगाव परिसरात सापळा रचून आरोपी रोशन ओव्हाळ व अमित भानुसघरे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 2 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सहायक पोलिस निरीक्षक सचिन राऊळ, उपनिरीक्षक शुभम चव्हाण, भारत भोसले, सचिन गायकवाड, नितेश कवडे, अंकुश नायकुडे, रहीस मुलानी, सुभाष शिंदे, अमोल ननवरे, अंकुश पवार, आशिष झगडे, होमगार्ड सागर दळवी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मावळात संकल्प नशामुक्ती अभियान

मावळ परिसरातील ड्रग्सचा वाढता विळखा रोखण्यासाठी व तरुणाईला नशेच्या आहारी जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी लोणावळा विभागाचे सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा

Back to top button