कुणबी दाखला काढायचा आहे ? गरजेची आहेत ही कागदपत्रे | पुढारी

कुणबी दाखला काढायचा आहे ? गरजेची आहेत ही कागदपत्रे

मराठा आणि कुणबी एकच असल्याचे अनेक कायदेशीर पुरावे उपलब्ध आहेत. मात्र, शासनाच्या आरक्षण धोरणात मराठा समाज हा खुल्या गटात, तर कुणबी समाज हा ओबीसी प्रवर्गात विभागला गेला आहे. वास्तविक, मराठा समाजाच्या व्यक्तींना देखील कायदेशीर प्रक्रियेने कुणबी दाखला मिळू शकतो. त्याद्वारे कुठलीही मराठा व्यक्ती खुल्या गटातून ओबीसी प्रवर्गात जाऊ शकते.

मराठा समाजातील व्यक्तींनी कुणबी दाखला कसा काढावा, त्यासाठी कोणती पूर्वतयारी करावी, कोणती कागदपत्रे जमवावीत आणि कुणबी दाखला काढण्याची प्रक्रिया कशी करावी, या सर्व बाबींची माहिती देत आहोत. खोटा कुणबी दाखला/जात प्रमाणपत्र तयार करणे हा गुन्हा आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास असे करणार्‍यांना मिळालेले सर्व लाभ तत्काळ काढून घेतले जातात तसेच त्याला कायद्यात शिक्षेची देखील तरतूद आहे.

कुणबी असल्याचा पुरावा कसा मिळवायचा ?

कुणबी दाखला काढण्यासाठी तुमच्याकडे कुणबी असल्याचा पुरावा असावा लागतो. त्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या 13 ऑक्टोबर 1967 किंवा या दिनांकाच्या आधी जन्म झालेल्या तुमच्या रक्त नातेसंबंधातील कोणत्याही नातेवाइकाची कुणबी जात असल्याचे सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे. रक्त नातेसंबंधातील नातेवाईक म्हणजे तुमचे वडील / चुलते / आत्या / आजोबा / पणजोबा / खापर पणजोबा / वडिलांचे चुलते किंवा आत्या / आजोबांचे चुलते किंवा आत्या / पणजोबांचे चुलते किंवा आत्या / खापरपणजोबांचे चुलते किंवा आत्या/ तुमच्या वाडवडिलांचे सख्खे किंवा चुलत भाऊ-बहिणी ज्यांच्याशी तुमचे नाते दर्शविणारी वंशावळ काढता येते अशी भावकी इत्यादी वरीलपैकी कुणाचाही कुणबी असल्याचा पुरावा मिळवण्यासाठी तुम्ही पुढीलपैकी पर्याय तपासून पाहू शकता.

1) रक्तसंबंधातील कोणत्याही नातेवाईकाचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला काढून त्यावर कुणबी अशी नोंद आहे का ते तपासावे.

2) स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील कोतवाल बुक किंवा गाव नमुना नं. 14 मध्ये प्रत्येकाच्या जन्म-मृत्यूची नोंद त्याच्या जातीसह ठेवली जात असे. पूर्वी या नोंदी दरमहा तहसील कार्यालयात पाठविल्या जायच्या. मात्र, 1 डिसेंबर 1963 पासून कोतवालाचे पद महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आले आणि त्यानंतर या नोंदी ठेवण्याचे काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आले. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या रक्तसंबंधातील नातेवाईकाचा जन्म किंवा मृत्यू ज्या गावात झाला असेल, ते गाव कोणत्या तहसील कार्यक्षेत्रात येते ते तपासावे. त्यानंतर संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून आपल्या रक्तनातेसंबंधातील नातेवाईकाचे नाव असणार्‍या गाव नमुना नं. 14 ची किंवा कोतवाल बुकची नक्कल मागणी करावी. नक्कल प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये त्यांची कुणबी अशी नोंद आहे का ते तपासावे.

3) आपल्या कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंदी (6 ड नोंदी), जमीन वाटप नोंदी, 7/12 उतारे, 8 अ उतारे, फेरफार, खरेदीखत, भाडेपट्टा, सातबारा अमलात येण्याआधी असणारे क.ड.ई. पत्र, सोडपत्र, खासरापत्रक, हक्कपत्रक किंवा तत्सम इतर कुठल्याही महसुली कागदपत्रांमध्ये रक्तसंबंधातील कोणत्याही नातेवाईकाचा कुणबी असा उल्लेख आहे का ते शोधावे आणि तसे असेल तर त्या कागदपत्राची प्रत काढून घ्यावी.

4) रक्तसंबंधातील नातेवाईक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असल्यास त्याच्या सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर संबंधित शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयाने त्या नातेवाइकाची कुणबी जात नोंद केलेली असल्यास त्या सर्व्हिस बुकचा साक्षांकित केलेला उतारा घ्यावा.

5) रक्तसंबंधातील नातेवाइकाने अगोदरच त्याचा कुणबी दाखला काढला असेल, तर त्याचा कुणबी दाखला आणि समाज कल्याण खात्याच्या छाननी समितीने वैध ठरविलेले त्याचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र ही कागदपत्रे देखील कुणबी असल्याचा पुरावा म्हणून चालू शकतात.

कुणबी दाखला काढण्यासाठी

आवश्यक कागदपत्रे
1) कुणबी जातीचा पुरावा – वर सांगितल्याप्रमाणे अर्जदाराचा किंवा रक्तसंबंधातील नातेवाइकाचा कुणबी जातीचा पुरावा (संबंधित नातेवाईक जर मृत असेल तर त्याच्या मृत्यूचा दाखलाही काढावा.)
2) रहिवासी पुरावा – अर्जदार किंवा त्याचे रक्तसंबंधातील नातेवाईक यांचे 13 ऑक्टोबर 1967 किंवा या दिनांकाच्या आधीपासून सर्वसाधारण कायमस्वरूपी वास्तव्य असलेल्या ठिकाणचा लेखी रहिवासी दाखला.
3) अर्जदाराचा आणि अर्जदाराच्या रक्तसंबंधातील नातेवाइकाचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाइड सर्टिफिकेट (दोन्हींवर जन्म तारीख व जन्मस्थान यांचा उल्लेख आवश्यक).
4) ओळखीचा पुरावा (कोणताही एक) ड्ढ अर्जदाराचा फोटो असणारे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा तत्सम अधिकृत ओळखपत्राची साक्षांकित प्रत.
5) पत्त्याचा पुरावा (कोणताही एक) ड्ढ अर्जदाराचे रेशन कार्ड, लाईट बिल, मिळकत कर पावती, 7/12 किंवा 8 अ उतारा, फोन बिल, पाणीपट्टी किंवा घरपट्टीची साक्षांकित प्रत.
6) जातीचा दाखला काढण्यासाठी आवश्यक असणारा विहित नमुन्यातील अर्ज व त्यावर 10 रुपयांचे कोर्ट फी स्टॅम्प / तिकीट आणि अर्जदाराचा फोटो.
7) 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अर्जदाराचे स्वतःच्या कुणबी जातीबाबत आणि रक्तसंबंधातील ज्या नातेवाइकाचा कुणबी जातीचा पुरावा सादर केला आहे.

कुणबी दाखला काढण्यासाठी तीन महत्त्वाचे टप्पे आहेत
1) कुणबी असल्याचा पुरावा मिळवणे
2) आवश्यक कागदपत्रे जमा करणे
3) कुणबी दाखला काढणे

Back to top button