निगडी टिळक चौकात मेट्रोचे स्टेशन; नागरिकांच्या सुविधेसाठी महामेट्रोचा निर्णय | पुढारी

निगडी टिळक चौकात मेट्रोचे स्टेशन; नागरिकांच्या सुविधेसाठी महामेट्रोचा निर्णय

मिलिंद कांबळे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी या विस्तारीत 4.519 किलोमीटर अंतराच्या मार्गावर डीपीआरमध्ये केवळ तीन मेट्रो स्टेशन होते. मात्र, नागरिकांचा सुविधेसाठी निगडी येथील टिळक चौकात आणखी एक स्टेशन बांधण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांना मेट्रो प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. महामेट्रोने तयार केलेल्या डीपीआरमध्ये चिंचवड स्टेशन चौक, आकुर्डीतील खंडोबा माळ चौक आणि निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक येथे असे एकूण 3 स्टेशन प्रस्तावित होते. त्याच कामांच्या डीपीआरला महापालिका, राज्य शासनाने मंजुरी दिली.

केंद्र शासनाने या विस्तारीत मार्गाच्या 910 कोटी 18 लाख खर्चास 23 ऑक्टोबर 2023 ला अंतिम मंजुरी दिली. त्यानंतर महामेट्रोने वेगात निविदा पूर्व तयारी करून मार्गिकेची (व्हायाडक्ट) निविदा 16 डिसेंबर 2023 ला प्रसिद्ध करण्यात आली. त्यात तीनऐवजी चार स्टेशनचा उल्लेख करण्यात आला आहे. चिंचवड स्टेशन, खंडोबा माळ, भक्ती-शक्ती समुह शिल्प चौक तसेच, निगडी येथील टिळक चौक येथे चौथा स्टेशन बनविले जाणार आहे. निविदेतील उल्लेखामुळे नव्या स्टेशनचा उलगडा झाला आहे.

नागरिकांच्या सुविधेसाठी चौथे स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक ते आकुर्डीच्या खंडोबा माळ हे अंतर 2 किलोमीटर आहे. अंतर जास्त असल्याने टिळक चौक परिसरातील नागरिकांना आपल्या वाहनाने प्रवास करून मेट्रो स्टेशनवर ये-जा करावी लागणार होती. स्टेशनपर्यंत ये-जा करण्यासाठी नागरिकांना रिक्षा, बस, खासगी वाहन किंवा इतर वाहनांचा वापर करावा लागू नये म्हणून टिळक चौकात स्टेशन उभारण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे. तसेच, टिळक चौकात दिवसभर नागरिकांची मोठी वर्दळ असते. कामगार, विद्यार्थी व नागरिकांची येथून ये-जा मोठ्या प्रमाणात होते. तेथे बस व रिक्षांना मोठी गर्दी होते. नागरिकांचा मोठा प्रतिसाद लक्षात घेऊन महामेट्रोने टिळक चौकात स्टेशनचा निर्णय घेतला आहे.

स्टेशनमधील असे असेल अंतर

मोरवाडी चौकातील पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते चिंचवड स्टेशन येथील पिंपरी पोलिस ठाणे येथील मेट्रो स्टेशनचे अंतर 1.463 किलोमीटर आहे. चिंचवड स्टेशन ते आकुर्डीतील खंडोबा माळ चौकातील स्टेशनमधील अंतर 1.651 किलोमीटर असणार आहे. खंडोबा माळ ते निगडीच्या टिळक चौक स्टेशनचे अंतर 1.062 किलोमीटर आहे. टिळक चौक ते भक्ती-शक्ती चौक स्टेशनमधील अंतर 975 मीटर आहे. या चार स्टेशनमुळे पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी-चिंचवड महापालिका, संत तुकारामनगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी व दापोडी असे एकूण 10 स्टेशन होतील.

सर्व स्टेशन साध्या स्वरूपात

पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी मार्गावरील चार स्टेशन असणार आहेत. मार्गिकेची निविदा काढली आहे. ते काम 130 आठवड्यांत पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. दीड महिन्यांनतर चार स्टेशन तयार करण्याची स्वतंत्र निविदा काढली जाणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ते दापोडी या मार्गावर आकर्षक आणि विविध रचनेतील भव्य स्टेशन आहेत. त्याप्रमाणे या विस्तारीत मार्गावरील स्टेशन आकर्षक नसणार आहेत. ते साध्या पद्धतीची असतील. मात्र, स्टेशनवर प्रवाशांसाठी असलेल्या सर्व सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रवास करणे अधिक सुलभ होईल, असे महामेट्रोच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

नागरिकांची वर्दळ लक्षात घेऊन निर्णय

निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प स्टेशनपर्यंत जाण्यासाठी निगडी व प्राधिकरणातील नागरिकांना अधिक अंतर पडत होते. त्यामुळे त्यांना रिक्षा, बस किंवा स्वत:चे वाहन वापरावे लागणार होते. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वर्दळीच्या निगडीच्या टिळक चौकात मेट्रो स्टेशन बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्या भागांतील नागरिकांना मेट्रोने प्रवास करणे अधिक सुलभ व सोईचे होणार आहे, असे महामेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button