चार महिन्यांपासून हरविलेल्या तरुणाला केले मातेच्या स्वाधीन | पुढारी

चार महिन्यांपासून हरविलेल्या तरुणाला केले मातेच्या स्वाधीन

ओतूर : पुढारी वृत्तसेवा :  चार महिन्यांपासून अलिबाग जिल्ह्यातून वाट चुकलेला व मानसिकदृष्ट्या सक्षम नसलेला अंदाजे 35 वर्षीय तरुण फिरत फिरत खामुंडी (ता. जुन्नर) येथे पोहचला. या वेळी त्याची येथील हॉटेलमालकाने चौकशी केली. मात्र, या तरुणाला फारसे बोलता येत नव्हते. त्यामुळे त्याच्याबद्दल फारशी माहिती मिळत नव्हती. विशेष बाब म्हणजे, हॉटेलमालकाच्या मुलालाही काहीच बोलता येत नव्हते. मात्र, त्याने या तरुणाकडून पेन व कागद देत मोडक्या-तोडक्या शब्दांत त्याचा पत्ता काढून घेतला आणि सामाजिक कार्यकर्ते व ओतूर पोलिसांमार्फत त्या तरुणाच्या आईशी संपर्क साधला. एक रात्र त्या तरुणाचा सांभाळ करीत शेवटी त्या तरुणाची आणि त्याच्या आईची अखेर भेट घडवून आणली.

खामुंडी येथील हॉटेलचालक केशव, त्यांची पत्नी पुष्पा, मुलगी निकिता आणि मुलगा ऋषिकेश क्षीरसागर आणि सामाजिक कार्यकर्ते कैलास बोडके यांनी वाट चुकलेल्या तरुणाची व आईची भेट घडवून आणली. खामुंडीतील श्रीकाळभैरवनाथ मंदिर परिसरात केशव क्षीरसागर यांना मंगळवारी (दि. 26) एक तरुण मानसिक रुग्णासारखे हावभाव करून फिरत असल्याचे दिसून आले. त्यावर केशव यांनी त्या तरुणाला थांबवत त्याची चौकशी केली. मात्र, त्याला फारसे बोलता व ऐकू येत नव्हते. त्यावर केशव यांनी त्यांची पत्नी पुष्पा, मुलगी निकिता आणि मुलगा ऋषिकेश क्षीरसागर यांना मदतीला घेतले. त्या तरुणाचा पत्ता काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश येत नव्हते. अखेर ऋषिकेशने बुद्धिचातुर्याच्या जोरावर त्याचा पत्ता काढून घेतला. विशेष बाब म्हणजे, ऋषिकेशला पूर्णपणे बोलता येत नाही. पेन व कागद देत ऋषिकेशने मोडक्या-तोडक्या शब्दांत त्याचा पत्ता लिहून घेतला. तेव्हा त्याचे नाव कारभारी नीलेश लक्ष्मण आणि गाव पारंगखार, तालुका रोहा, जिल्हा अलिबाग असल्याचे समजले.

त्यावर ऋषिकेशने कारभार्‍याचा फोटो काढून त्याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते कैलास बोडके यांना दिली. बोडके यांनी ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे, पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील, पोलिस हवालदार महेश पटारे यांना कळवली. तसेच बोडके यांनी रोहाचे पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांचा मोबाईल नंबर शोधून त्यांनाही संपर्क केला. त्यानुसार कारभारी याचा फोटो आणि माहिती दिली. त्यानुसार रोहा पोलिसांनी कारभारी याचे घर शोधून त्याच्या आईशी संपर्क साधला. कारभारी हा जवळपास चार महिन्यांपासून हरविल्याचे त्याच्या आईने सांगितले.

इकडे रात्र जास्त झाल्यामुळे कारभारी याला बोडकेंसह लालू महाले व केशव क्षीरसागर यांच्या मदतीने थांबवून घेतले. बुधवारी (दि. 27) सकाळी कारभारीची आई खामुंडी येथे आली. त्या वेळी पोलिस कर्मचारी राजेंद्र कोंढार, पोलिस पाटील दत्ताराम कांबळी यांच्या समक्ष खात्री करून कारभारी यास आईच्या स्वाधीन करण्यात आले. क्षीरसागर कुटुंबीय व कैलास बोडके यांच्या सजगतेबद्दल त्यांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

हेही वाचा :

Back to top button