ऊसतोडणी मजुरीचा निर्णय नववर्षातच होणार | पुढारी

ऊसतोडणी मजुरीचा निर्णय नववर्षातच होणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात यंदाच्या हंगामापासून प्रचलित ऊसतोडणी मजुरीच्या दरात किमान चाळीस टक्के वाढ करून प्रतिटन 410 रुपये मजुरी देण्याच्या मागणीवर बुधवारी (दि. 27) मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट (व्हीएसआय) येथे झालेल्या संयुक्त बैठकीत उभयमान्य तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता नववर्षात म्हणजे 4 किंवा 5 जानेवारीला ऊसतोडणी कामगार आणि राज्य सहकारी साखर कारखाना संघातील पदाधिकार्‍यांमध्ये पुन्हा अंतिम बैठक होऊन निर्णय होणार आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वाहतूक कामगार संघटनेच्या वतीने सुरू करण्यात आलेले ’कोयता बंद’ आंदोलन पुढील बैठकीपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अंतिम बैठकीतही जर ऊसतोडणी मजुरीदरात वाढ झाली नाही, तर ’कोयता बंद’ आंदोलन करण्याचा इशारा ऊसतोड कामगार संघटनांनी बैठकीअंती दिला आहे. बैठकीत साखर संघ 29 टक्के, तर कामगार संघटना 40 टक्के दरवाढीवर ठाम राहिले. ऊसतोडणी मजुरीसाठी बुधवारी झालेली उभयपक्षी झालेली पाचवी बैठक होती.

ऊसतोडणी दरवाढीची पाचवी बैठक व्हीएसआयमध्ये झाली. बैठकीस राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, आमदार प्रकाश सोळंके, आमदार प्रकाश आवाडे, कल्याणराव काळे, संजय खताळ तर ऊसतोड कामगार संघटनांचे डॉ. डी. एल. कराड, सुरेश धस, प्रा.डॉ. सुभाष जाधव, प्रा. आबासाहेब चौगले, दत्ता डाके, जीवन राठोड, सुखदेव सानप, दादा मुंडे, दत्तात्रय भांगे, नामदेव राठोड, मोहन जाधव, श्रीमंत जायभावे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button