दुर्दैवी ! एसटीच्या मागे धावताना पडल्याने विद्यार्थी जखमी | पुढारी

दुर्दैवी ! एसटीच्या मागे धावताना पडल्याने विद्यार्थी जखमी

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी एसटी बस पकडण्यासाठी धावत असलेला विद्यार्थी पाय घसरून जमिनीवर पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. नशीब बलवत्तर म्हणून तो या अपघातातून बचावला. निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे सोमवारी (दि. 18) सायंकाळी हा प्रकार घडला. आयुष आबासाहेब आदलिंग असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आयुष हा श्री केतकेश्वर विद्यालयात इयत्ता सहावीत शिकतो.

सोमवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे आयुष हा विद्यालय सुटल्यानंतर गोतोंडीला घरी जाण्यासाठी बसथांब्यावर आला. या वेळी एसटी बस आली असता, ती पकडण्यासाठी तो मागे धावला. मात्र बस थांबली नाही. बस पकडण्याच्या प्रयत्नात तो खडीवर घसरून खाली पडला. यामध्ये याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्याच्या डोक्यातून रक्तस्राव होऊ लागला. या वेळी तेथून चाललेल्या अ‍ॅड. सचिन राऊत यांनी त्याला त्यांच्या वाहनात घेत तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आयुषच्या डोक्यावर चार टाके घेण्यात आले.

सध्या या ठिकाणी पालखीमार्गाचे काम चालू आहे. रस्त्यावर खडी पडलेली आहे. शिवाय, रस्ता अरुंद आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना एसटी बस पकडण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. एसटीने प्रवास करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या व त्यांचे शाळा भरण्याचे व सुटण्याचे वेळापत्रक त्यानुसार एसटी बस सोडाव्यात. एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे आयुष आदलिंग हा जखमी झाला. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण व्हावे तसेच एसटी आगाराने बसथांब्याच्या चालकांना तातडीने सूचना द्याव्यात.
                                                                              – अ‍ॅड. सचिन राऊत

अनेकदा शाळेत येताना व सुटल्यानंतर बस वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. आलेली बस पकडण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते. शाळा सुटल्यानंतर तर दोन-दोन तास विद्यार्थी जागेवरच बसची वाट बघत असतात. काही वेळा बस मोकळी असूनदेखील थांबविली जात नाही. त्यामुळे पालकांना दुचाकीवरुन मुलांची
ने-आण करावी लागते. त्यामुळे इंदापूर आगाराने विद्यार्थ्यांच्या शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेनुसार पुरेशा बस सोडाव्यात, अशी पालकांची मागणी आहे.
                                             – आबासाहेब आदलिंग, जखमी आयुषचे वडील

Back to top button