Rise Up : दोन दिवस रंगणार महिलांच्या टेबल टेनिसचा थरार | पुढारी

Rise Up : दोन दिवस रंगणार महिलांच्या टेबल टेनिसचा थरार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दै. ‘पुढारी’च्या वतीने महिला जिल्हास्तरीय स्पर्धेच्या दुसर्‍या हंगामाला सुरुवात झाली आहे. या उपक्रमांतर्गत महिलांच्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दै. ‘पुढारी’च्या वतीने पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड भागातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि खेळाचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘राईज अप’ पुणे महिला क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील वर्षी सुरू झालेल्या फक्त महिलांसाठी ‘राईज अप’ या क्रीडा स्पर्धांच्या उपक्रमाच्या सीझन 2 ची सुरुवात या वर्षी सप्टेंबर महिन्यात बुद्धिबळ, कॅरम स्पर्धेने झाली होती. त्यानंतर महिलांच्या जिल्हास्तरीय कुस्ती आणि जलतरण स्पर्धाही उत्साहात पार पडल्या. महाराष्ट्रात अशा प्रकारची केवळ महिलांसाठी स्पर्धा घेणारा दै. ‘पुढारी’ हा एकमेव माध्यम समूह आहे.

‘राईज अप’ पुणे महिला जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा होणार आहे. या स्पर्धा पूना डिस्ट्रिक्ट टेबल टेनिस असोसिएशनच्या सहकार्याने शनिवार, दि. 2 आणि रविवार, दि. 3 डिसेंबर असे दोन दिवस होणार आहेत. या स्पर्धा प्रभात रोड येथील सिंबायोसिस स्कूलच्या सिंबायोसिस स्पोर्ट्स सेंटर येथे होणार आहेत.

स्पर्धेमध्ये पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण येथून महिला खेळाडू सहभागी होणार असून, आज गुरुवार, दि. 30 नोव्हेंबरच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत नावनोंदणी सुरू राहणार आहे. ही स्पर्धा अकरा वर्षांखालील, तेरा वर्षांखालील, पंधरा वर्षांखालील, सतरा वर्षांखालील, एकोणीस वर्षांखालील, खुला गट आणि अनुभवी महिला अशा सात गटांत होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात आलेली नसून, मोफत प्रवेश आहे.

या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी entries.tt@gmail.com या ई-मेल आयडीवर आपला प्रवेश नोंदवावा, असे आवाहन ‘पुढारी’च्या वतीने करण्यात आले आहे. खेळाडूंसह पालकांनीही या स्पर्धेला उपस्थित राहण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.

‘राईज अप सीझन 2’ साठी माणिकचंद ऑक्सिरिच हे मुख्य प्रायोजक असून, सहप्रायोजक म्हणून रुपमंत्रा, मीडिया प्रायोजक म्हणून झी टॉकीज, एज्युकेशन पार्टनर म्हणून सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट, बँकिंग पार्टनर म्हणून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी आणि सपोर्टिंग पार्टनर म्हणून पुणे महानगरपालिका यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी अतुल मगर 9822441953 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोठे आहेत स्पर्धा…

सिंबायोसिस स्कूलच्या सिंबायोसिस स्पोर्ट्स सेंटर, प्रभात रोड, पुणे.
दि. 2 आणि 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 पासून.
अधिक माहितीसाठी : मधुकर लोणारे – 9423576782.

हेही वाचा

Vinayak Raut : राज्य शासन पळपुटं, विनायक राऊत यांचे टीकास्त्र

New York : गेल्या वीस वर्षांपासून ‘या’ झाडातून येत आहे पाणी!

Telangana Assembly elections : जनगावमध्‍ये भाजप-बीआरएस कार्यकर्ते भिडले

Back to top button