मुळशी प्रादेशिकची जलवाहिनी फुटल्याने पौडसह काही गावांचा पाणीपुरवठा बंद | पुढारी

मुळशी प्रादेशिकची जलवाहिनी फुटल्याने पौडसह काही गावांचा पाणीपुरवठा बंद

पौड : पुढारी वृत्तसेवा :  पौड आणि परिसरातील काही गावांना पाणीपुरवठा करणार्‍या मुळशी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी जामगाव-दिसली याठिकाणी पुन्हा फुटली. मुळशी प्रादेशिकचा पाणीपुरवठा सतत काही ना काही कारणाने खंडित होत आहे, त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मुळशी प्रादेशिक योजनेतून पौड, कोंढावळे, आंदेशे तसेच जवळील काही गावात पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन तीन दिवसांपूर्वी फुटली. यामुळे या तीनही गावातील नागरिक पाणी नसल्याने अडचणीत आले आहेत.

संबंधित बातम्या :

ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात वीजबिल थकल्याने मुळशी प्रादेशिकचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला होता, तेव्हाही सहा ते सात दिवस पाणी बंद होते. जून महिन्यात माले येथे पाईप लाईन फुटल्याने आठवडाभर पाणीपुरवठा बंद होता. आता जामगाव-दिसली येथे जलवाहिनी पुन्हा फुटल्याने पौड, कोंढावळे, आंदेशे व इतर काही गावांचे पाणी बंद झाले आहे. या गावातील मुळशी प्रादेशिकचे पाणी हाच मुख्य आधार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद झाल्यास विकतचे पाणी घ्यावे लागते. लवकरात लवकर जलवाहिनीची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पौड येथे मुळा नदीवरून दुसर्‍या पाईपमधून पाणी घेऊन ते टाकीत सोडून गावात सोडण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. हे पाणी फक्त नागरिकांना वापरण्यासाठी आहे. त्यांचा वापर पिण्यासाठी करू नये.
                                                                         प्रमोद शेलार, सरपंच, पौड

 

Back to top button