गुटखाबंदी तर झाली, माव्याचे काय? पालकांची चिंतेत | पुढारी

गुटखाबंदी तर झाली, माव्याचे काय? पालकांची चिंतेत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने राज्यात गुटखा विक्री करण्यावर मागील अनेक वर्षांपासून प्रतिबंध घातला आहे. असे असले तरी अद्यापही चोरट्या मार्गाने गुटखा विक्री सर्वत्र सुरू आहे. उलट गुटखाशौकिनांना जास्तीचे पैसे मोजून आपली तलफ भागवावी लागत आहे. अनेकवेळा कारवाई देखील केली जाते. परंतु, अद्यापही पूर्णपणे गुटखाबंदी करण्यात शासनाला अपयश आले आहे. त्यातच आता मावा, खर्रा अशा तत्सम पदार्थांनी तोंड वर काढले असून, याची धडाक्यात विक्री केली जात आहे.

गुटखाबंदी झाल्यापासून शौकिनांनी आपली तलफ भागविण्यासाठी पर्यायी मार्ग शोधले आहेत. मावा, खर्रा अशा घातक पदार्थांनी सर्व बाजारपेठ काबीज केली आहे. ठरावीक विभागाचे नाव देऊन यांची राजरोसपणे विक्री सुरू आहे. यामध्ये नागपुरी खर्रा, नगरी मावा, सासवडचा मावा यांचा प्रामुख्याने समावेश आहे. अमुक-अमुक विभागातील प्रसिद्ध मावा मिळेल, असे बोर्ड लावून याची सर्वत्र धूमधडाक्यात विक्री सुरू आहे.

या माव्यात सुपारी, सुगंधी तंबाखू आणि चुना यांचे मिश्रण करून ते एकजीव करून प्लास्टिकच्या अगदी छोट्या पुडीत देण्यात येते. गुटख्याच्या तुलनेत अतिशय स्वस्त दरात हे मिळते. पाच ते दहा रुपयांना याची विक्री केली जाते. त्यामुळे कुठेही सहज उपलब्ध होणारा हा मावा गुटखाशौकिनांची तलफ भागवत आहे. एकीकडे या मावा विक्रीतून तरुणांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, दुसरीकडे याच माव्यामुळे तरुणाईवर गंभीर परिणाम होत आहेत.

कॅन्सरला आमंत्रण देणारा मावा

मावा हा शरीरासाठी अत्यंत घातक आहे. यामुळे अतिगंभीर आजार होण्याची शक्यता असते. ग्रामीण भागात तर वर्षाकाठी अनेक रुग्ण गंभीर आजाराचे सापडत आहेत. यामध्ये प्रामुख्याने कॅन्सर या गंभीर आजाराचा समावेश आहे. मावा पदार्थावर कुठेही बंदी नसल्याने शाळा, महाविद्यालय येथे सहज उपलब्ध होणार्‍या माव्याकडे तरुणवर्ग आकर्षिला जात आहे. त्यामुळे पालकवर्गाची चिंता वाढली आहे. अनेक सार्वजनिक ठिकाणे या माव्यामुळे लालबुंद होत आहेत.

हेही वाचा

Back to top button