Goa News : काणकोणात समुद्रकिनारी बारमाही पर्यटक | पुढारी

Goa News : काणकोणात समुद्रकिनारी बारमाही पर्यटक

काणकोण; पुढारी वृत्तसेवा : राज्यात एकूण 106 किलोमीटर किनारपट्टी आहे. त्यातील एकट्या काणकोण तालुक्यात 26 किलोमीटर किनारपट्टी लाभलेली आहे. त्यामुळे वर्षाच्या बाराही महिने येथील किनार्‍यांवर देशी तसेच विदेशी पर्यटकांची गर्दी असते. सुट्टीच्या दिवसात तर देशी पर्यटक आपल्या कुटुंबीयांसमवेत किनार्‍यांवर मौजमजा करायला आलेले असतात.

काणकोण तालुक्यात पाळोळे, ओवरे, पाटणे, आगोंद, खणगिणी-खोला, गालजीबाग, तळपण, देवावेळ, धारवेळ, पोळे, देवाबाग असे डझनभर समुद्रकिनारे आहेत; पण यातील पाळोळे व आगोंद समुद्रकिनारे जगप्रसिद्ध असल्याचे वेळोवेळी जाहीर केले जाते. त्यामुळे या किनार्‍यांवर देशी-विदेशी पर्यटक येतात. तालुक्यातील सगळ्याच किनार्‍यावर वाहने पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे. तसेच निवासी तंबू उभारण्यात आले आहेत. पावलोपावली शॅक्स उभारण्यात आले आहेत. त्यामुळे जेवणाचीही उत्तम सोय आहे.
काणकोण तालुका गोव्याच्या सीमेवर असल्याने कर्नाटकमधील कारवार जिल्हा या तालुक्याला लागून आहे. त्यामुळे दक्षिण भारतीय पर्यटक गोव्यात मोठ्या संख्येने येतात. दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत असल्याचे सांगितले जात आहे.

पालिकेला चांगला महसूल

पाळोळे, ओवरे, पाटणे व देवावेळ हे चार समुद्रकिनारे काणकोण पालिका क्षेत्रात येतात. त्यामुळे काणकोण पालिकेला चांगला महसूल प्राप्त होतो, अशी माहिती काणकोण पालिकेच्या माजी नगराध्यक्ष सूचना गावकर यांनी दिली; पण हे किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी काणकोण पालिका मंडळाने प्रयत्न करायला हवेत, असे त्या म्हणाल्या.

Back to top button