दुष्काळछाया ! घोड नदीमधील पाणीसाठा खालावला | पुढारी

दुष्काळछाया ! घोड नदीमधील पाणीसाठा खालावला

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा :  इनामगाव (ता. शिरूर) येथील घोड नदीपात्रातील पाणीपातळी खालावली असून, एक महिना पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. या भागातील शेतकर्‍यांनी चिंचणी घोड धरणातून पाणी सोडून कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे भरून घ्यावे, अशी मागणी केली आहे. शिरूरच्या पूर्व भागामध्ये चालू वर्षी म्हणावा असा पाऊस झाला नाही. त्यामुळे या भागातील कुपनलिका व विहिरींमध्ये म्हणावा असा पाणीसाठा उपलब्ध झाला नाही.

संबंधित बातम्या : 

त्यामुळे या परिसरात चालू वर्षी दुष्काळाची छाया निर्माण झाली आहेत. यावर्षी फक्त दहा ते बारा दिवसच या परिसरामध्ये पाऊस पडला. त्यामुळे निदान चिंचणी धरणामध्ये पाणीसाठा वाढला व धरण 100 टक्के भरले. ज्या वेळी चिंचणी धरणांमधून पाणीसाठा खाली वाहत होता, त्या वेळी मात्र संबंधित अधिकार्‍यांनी ढापे टाकण्याचे काम केले नाही. मात्र, पाणी संपल्यानंतर ढापे टाकण्याचे काम संबंधित पाटबंधारे विभागाने सुरू केली. त्यामुळे या परिसरामध्ये पाण्याची टंचाई एका महिन्यानंतर जाणवणार असल्याचे उपसरपंच सूरज मचाले यांनी सांगितले

अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे दुष्काळ
याबाबत तुकाराम मचाले यांनी सांगितले, की संबंधित अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे दरवर्षी इनामगावला पाण्याचा तुटवडा जाणवतो. चालू वर्षी पाऊसच झाला नव्हता मग संबंधित पाटबंधारे अधिकार्‍यांनी पाण्याचा अंदाज पाहून ढापे टाकणे गरजेचे होते. दरवर्षी पाटबंधारे विभागाला पाण्याचे नियोजन व्यवस्थित करत नाही. अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे चालू वर्षी लवकरच या भागातील शेतकर्‍यांना दुष्काळाचा झळा जाणवणार आहेत.

चालू वर्षी पावसाळ्यामध्येच पाऊस कमी पडल्यामुळे घोड नदीमध्ये पाणीसाठा कमी झाला आहे, त्यामुळे आतापासूनच दुष्काळाच्या झळा शेतकर्‍यांना सोसावे लागणार आहेत. अजून पुढे उन्हाळा येणार आहे तोपर्यंत या भागातील शेतकर्‍यांची पिके पाण्याअभावी जळून जातील त्यामुळे संबंधित विभागाने पाण्याची गळती होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. वरील धरणामध्ये जे पाणी आहे, त्यातील पाणी चिंचणी धरणमध्ये सोडून ते पाणी घोड नदीला सोडावे.
                                                  अनुराधा घाडगे, सरपंच, मांडवगण फराटा.

Back to top button