Pune News : धूमधडाका मोजला कसा? | पुढारी

Pune News : धूमधडाका मोजला कसा?

वर्षा कांबळे

पिंपरी : दिवाळीनिमित्त शहर व उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात आवाजाचे व रोषणाईचे फटाके फोडले जात आहेत. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण मोजण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे नेहरूनगर गुलाबपुष्प उद्यानाजवळ वायुप्रदूषणाचा डिजिटल बोर्ड लावण्यात आला आहे. या ठिकाणी एमआयडीसी आणि श्वान दफनभूमी आहे. त्यामुळे शहरातील लोकवस्तीत मोठ्या प्रमाणात फटाके फुटत असल्यास वायुप्रदूषण मोजायचे कसे, हा प्रश्न आहे.

दिवाळी सणामध्ये शहरातील मुख्य चौकातील लोकवस्तीच्या ठिकाणी फटाके फोडण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच, रस्त्याकडेला असणार्‍या झोपडपट्टीतील नागरिक देखील जागेअभावी रस्त्यावर फटाके फोडतात. या सर्वांचा आवाज आणि प्रदूषण मोजण्याची यंत्रणा शहरात लावण्यात आली आहे. मात्र, ती लोकवस्तीपासून दूर असल्याने नक्की वायू आणि आवाज मोजला जातो का? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

लोकवस्तीत, चौकात धुराचे लोट

शहरात दिवाळीमध्ये फक्त घरासमोरच नाही तर मुख्य चौकातील व रस्त्यावरील दुकानांसमोर फटाके फोडले जातात. या वेळी तेवढ्या परिसरातील वातावरणात मोठ्या प्रमाणात धूर पसरतो. पण, या ठिकाणी वायुप्रदूषण मोजण्याची कोणतीही यंत्रणा नाही.

शहरात चार ठिकाणी यंत्रणा

शहरामध्ये चिंचवड येथील चापेकर चौक, पिंपरी डिलक्स चौक, डांगे चौक व थेरगाव या ठिकाणच्या मुख्य चौकात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ध्वनिमापक यंत्रणा बसविली आहे. घरातील अंगणे, पार्किंग हे सोडून चौकात वर्दळीच्या ठिकाणी फटाके कोण फोडणार?

श्वास घेण्यास त्रास

दिवाळी सणामध्ये फटाक्यांमुळे होणार्‍या धुराने श्वसन रोग व फुप्फुसाच्या आजारात वाढ होते. त्यामुळे कमी प्रमाणात फटाके वाजविण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास प्रतिसाद देत काहींनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली. दिवाळीतील फटाक्यांमुळे धूळ आणि धूर दोन्ही दमा, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि बालकांसाठी धोकादायक ठरू शकतात. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे प्राणी व पक्षी यांच्यावर देखील परिणाम होतो. तसेच नागरिकांना कानात दडे बसणे, कान दुखणे, तात्पुरता बहिरेपणा येऊ शकतो.

शहरातील चार भागांत ध्वनिमापक यंत्रणा बसविली आहे. दिवाळीत ते मॉनिटरिंग करून आम्हाला त्याचा रिपोर्ट चार दिवसांनी मिळतो.

– मंचक जाधव (उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळ पिं.-चिं)

एकीकडे सरकार फटाके फोडण्यावर बंदी घालते, तर दुसरीकडे परवानगी देते. वायुप्रदूषण होते म्हणून शहरात कचरा जाळायला बंदी आहे; परंतु फटाके फोडायला नाही. या निर्णयात विसंगती आहे. फटाक्यांमुळे ध्वनी व वायुप्रदूषण होते. यामुळे श्वसनाचे रोग वाढतात. त्यामुळे फटाक्यांवर बंदी घातली पाहिजे. –

अ‍ॅड.प्रभाकर तावरे, माजी सहायक आरोग्य अधिकारी, पिं.-चिं. मनपा

हेही वाचा

गाढ झोप म्हणजे काय?

सर्कशीतून पळालेल्या सिंहाचा रस्त्यावर फेरफटका!

Tamil Nadu Rain: तामिळनाडूत मुसळधार पाऊस; अनेक जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंद

Back to top button