

रोम : जंगलाचा राजा सिंह आणि वाघ यांचं नाव घेतलं तरी अंगावर काटा येतो. सिंहाची गर्जना ऐकून आपल्याला घाम फुटतो. शहरामध्ये सर्कसमध्येही हे प्राणी पाहायला मिळतात. तुम्ही कधी विचार केला का, जर सर्कसमधील सिंह शहरातील रस्त्यावर मोकाट सुटेल तेव्हा काय होईल! अशाच एका सर्कसमधून सिंह पळून गेला अन् मग शहरात दहशत पसरली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
हा धक्कादायक व्हिडीओ इटली शहरातील असून, सर्कसमधून सिंह रस्त्यावर आल्यामुळे एकच घबराट पसरली. लाडिस्पोली शहरातील लोकांना सिंहामुळे घरात लपून राहावे लागले. 'द सन'च्या वृत्तानुसार, सिंहाची दहशत पाहता लाडिस्पोलीचे महापौर अॅलेसँड्रो ग्रँडो आणि स्थानिक प्रशासनानेही लोकांना घरातच राहण्याचं आवाहन केलं होतं. पोलिस आणि सर्कस कामगारांनी सिंहाला पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. 'किंबा' म्हणून ओळखल्या जाणार्या या सिंहाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सर्कस आणि सोशल मीडियावरील प्रसिद्ध 'किंबा' रस्त्यावर आल्यानंतर मात्र शहरात दहशत पसरली.
पोलिस, सर्कसचे कर्मचारी आणि पशुवैद्यकांना मोठ्या प्रयत्नांनंतर सिंह पकडण्यात यश आले. सिंहाला पकडणे त्यांच्यासाठी खूप कठीण होतं. कारण, रायफलसह सज्ज असलेल्या तीन पशुवैद्यांनी सिंहाला शोधून त्याला ट्रँक्विलायझर्सने शूट केलं, मात्र त्याला बेशुद्ध करण्यात ते अपयशी ठरले होते. 'किंबा'ला गजाआड करण्यासाठी पोलिस आणि सर्कसच्या कर्मचार्यांना अनेक तास घाम गाळावा लागला. अखेर रात्री उशिरा साडेआठच्या सुमारास दुसर्यांदा बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला. पण, सिंहावर औषधाचा काहीही परिणाम झाला नाही आणि तो पुन्हा पळून जाण्यात यशस्वी झाला. शेवटी शहरातील सांगुइनारा ओढ्याच्या काठावर दलदलीत 'किंबा' सिंह अडकला आणि शेवटी रात्री 10 वाजता 'किंबा'ला पकडण्यात यश आलं. दरम्यान, रॉनी रोलर सर्कस सिंह पिंजर्यातून कसा सुटला, याचा तपास सुरू आहे.