Pimpri News : बाबा सांगा हेल्मेट घातले का? | पुढारी

Pimpri News : बाबा सांगा हेल्मेट घातले का?

दापोडी : पुढारी वृत्तसेवा : शहरातील काही रस्ते प्रशस्त आणि चकाचक झाले आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग वाढला असल्यामुळे कमी वेळेत जास्त अंतर कापता येत असून, वेळेची बचत होत आहे. मात्र, नियमांचे पालन केले जात नसल्याने अपघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. यामध्ये हेल्मेट न घातल्याने सर्वांधिक मृत्यू होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शहरात रोज अपघात

दुचाकीवरून जाणारे एक कुटुंब दापोडीतील चौकात अपघाताचे शिकार ठरण्याचे उदाहरण ताजे आहेत. हा अपघात पाहून तरी आपण जागे झाले पाहिजे. वेळीच खबरदारी घेतली पाहिजे. शहरात दररोज कुठे ना कुठे अपघात होतात. दोन आठवड्यांपूर्वी पुणे-मुंबई महामार्गावर फुगेवाडी येथे आणि वाघोली येथे अपघात झाले होते. या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये डोक्याला दुखापत होऊन काहींचा जागीच मृत्यूदेखील झाला होता.

नियंत्रण सुटल्याने अपघात

शहरातील अंतर्गत रस्त्यावरदेखील मोठी वर्दळ असते. काही भागातील रस्ते अजूनही खड्डे आहेत. परिणामी वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. या अपघातामध्ये अनेक जण जायबंदी झाले आहेत. तर, काही जणांना प्राणाची किंमत मोजावी लागण्याचे विदारक चित्र आहे.

दुचाकीचालक विनाहेल्मेट वाहन चालवल्याचे आढळून आल्यास पहिल्यांदा 500 व दुसर्‍यांदा दीड हजार रुपये दंड होऊ शकतो. त्यामुळे वाहनचालकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरावे.

– श्रीराम पौळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

शहरामध्ये वाढते अपघात चिंतेचा विषय बनला आहे. बाबा दुचाकीवर घराबाहेर जात असताना त्यांना हेल्मेट घालण्यासाठी आठवण करून देते. ते घरी येईपर्यंत मी त्यांची आतुरतेने वाट पाहत असते.

– सई सरवदे, पिंपळे गुरव

रस्त्यावर मी डोळ्याने अनेक अपघात पाहिले आहेत. माझे बाबा दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेट घालतात. ते घराबाहेर जाण्यापूर्वीच मी त्यांच्या हातात न चुकता हेल्मेट देतो. त्यामुळे त्यांना हेल्मेट घालावेच लागते.

– रोहण बोराडे, पिंपळे गुरव

हेही वाचा

Back to top button