Pimpri News : पाणी फिल्टर प्लॅन्टचा नेमका कोणाला फायदा ? | पुढारी

Pimpri News : पाणी फिल्टर प्लॅन्टचा नेमका कोणाला फायदा ?

देहूगाव : पुढारी वृत्तसेवा : माळीनगर आणि देहू नगरपंचायत कार्यालय या ठिकाणी पाणी फिल्टर प्लॅन्ट बसवण्यात आले आहेत. परंतु, येथील पाण्याचा दर दुप्पट करण्यात आला आहे. सध्या 10 रुपयांना 20 लिटर पाणी मिळत आहे. त्यामुळे याचा फायदा वारकरी व सर्वसामान्यांना होणार नसून केवळ ठेकेदाराला होणार आहे. त्यामुळे दरवाढ रद्द करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

30 हजार रुपये वीजबिल थकीत

देहूगाव नगरपंचायतीच्या मालकीच्या दोन फिल्टर प्लॅन्टचा लिलाव मागील महिन्यात करण्यात आला होता. तो दोन लाखांचा लिलाव देहूतील चैतन्य विकास समितीने घेतला. माळीनगर आणि देहूनगर पंचायत कार्यालय अशा दोन ठिकाणी असलेले हे दोन्ही पाणी फिल्टर प्लॅन्ट सरकारी जागेत आहेत. त्यामुळे भाड्याचा प्रश्न येत नाही.

शिवाय माळीनगरमधील पाणी फिल्टर प्लॅन्टचे जवळपास 25 हजार तर देहूनगर पंचायतीमधील पाणी फिल्टर प्लॅन्टचे 5 हजार वीज बिल थकीत होते. हे बिल चैतन्य विकास समितीने भरायचे ही अट या लिलाव प्रक्रियेत होती. या वेळी नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल, सोनाली घोडेकर, गोरख टिळेकर, जयराज भसे, संभाजी बाळसराफ, संदीप परंडवाल, संतोष विधाटे, प्रसाद सातव आदी उपस्थित होते.

मुख्याधिकार्‍यांना दिले निवेदन

या दोन्ही ठिकाणचा पाण्याचा दर 5 रुपयांना 20 लिटर असा होता. परंतु, चैतन्य विकास समितीने तो दर 10 रुपयांना 20 लिटर असा केला आहे. म्हणजेच दुप्पट दराने पाणी दिले जात आहे. वर्षभरात चार मोठ्या यात्रा असतात. त्यानिमित्त लाखो, तर दररोज हजारो वारकरी भाविकफक्त येत असतात. तसेच, देहूच्या काही अंतरावर औद्योगिक क्षेत्र असल्याने कामगार मोठ्या प्रमाणात देहूत वास्तव्य करीत आहेत. नगरपंचायतीने ही जाचक दरवाढ रद्द करून सामान्य नागरिक व वारकर्‍यांना दिलासा द्यावा, अशा मागणीचे निवेदन भाजपच्या वतीने मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांना देण्यात आले आहे.

हे दोन्ही ए.टी.एम. आर ओ, चैतन्य विकास समितीस दिले आहेत. थकीत वीजबिल भरण्याची जबाबदारी त्यांची आहे. जर त्यांनी वीजबिल भरले नाही आणि पाणी फिल्टर प्लॅन्ट सुरू केले नाहीत तर ते नगरपंचायत पुन्हा ताब्यात घेईल. थकीत वीजबिल भरले जावे, सर्व सुरळीत व्हावे यासाठी आपण हे प्लॅन्ट चालवायला दिले. त्यांचाही खर्च निघावा यासाठी दर वाढविले असतील. संबंधित ठेकेदाराने दर वाढीचे बोर्ड लावले आहेत. परंतु, आम्ही या संदर्भातील आदेश दिलेला नाही.

राम खरात, कार्यालयीन अधीक्षक, देहू नगरपंचायत

हेही वाचा

 

Back to top button