बावडा ग्रामपंचायत निवडणुकीत नोटाला लक्षणीय मते | पुढारी

बावडा ग्रामपंचायत निवडणुकीत नोटाला लक्षणीय मते

राजेंद्र कवडे देशमुख

बावडा : बावडा ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी नोटाला लक्षणीय अशी 141 मते मिळाली आहेत. तसेच प्रत्येक प्रभागातदेखील नोटाला सुमारे 40 पर्यंत मते मिळाली आहेत. ग्रामीण भागातील अशिक्षित जनतेकडून तसेच वयोवृद्ध मतदारांकडून मतदार केंद्रातील गंभीर वातावरणामध्ये मतदान उरकण्याच्या घाईमुळे तसेच चिन्हे ठळकपणे दिसत नसल्याने नोटाला मते गेली असावीत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बावडा ग्रामपंचायत सरपंचपदासाठी भाजप पॅनेलच्या पल्लवी रणजित गिरमे यांना 4 हजार 389, राष्ट्रवादी काँग्रेस पॅनेलच्या फरझाना साजिद मुलाणी यांना 2 हजार 645 तर अपक्ष लक्ष्मी लहू कुर्डे यांना 368 मते मिळाली. सरपंचपदी पल्लवी गिरमे 1 हजार 524 मतांनी विजयी झाल्या.

संबंधित बातम्या :

बावडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी फक्त 3 उमेदवार होते, तरी नोटाला तब्बल 141 मध्ये मते मिळाली. जर अनेक उमेदवार असते तर नोटाची मते आणखी वाढली असती, अशी चर्चा आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांना 4 चिन्हांवर मतदान करावयाचे असल्याने अनेक अशिक्षित मतदारांना चिन्हे पाठ होत नसल्याने कसेतरी मतदान पूर्ण करून बाहेर पडायचे या मानसिकतेतून नोटाला मते मिळाल्याचा अंदाज आहे. मतदान यंत्रावर जर 3 मते दिली तरी मतदान पूर्ण होत नव्हते, तर चौथे मत दिल्यानंतरच मतदान हे यंत्रामध्ये नोंदविले जात होते. त्यामुळे अनेक मतदारांकडून चौथे मत कुठेतरी देऊन मतदान उरकण्याच्या नादात नोटाला मते गेली असावीत, असे जाणकारांनी सांगितले.

ग्रामीण जनता एवढी हुशार नाही की ती ठरवून नोटाला (वरीलपैकी एकही नाही) मतदान करेल. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत योग्य उमेदवाराला मतदान होण्यासाठी, मत वाया जाऊ नये म्हणून मतदारांमध्ये अधिकची जनजागृती करण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे. तसेच मतदानयंत्रावरील कागद हे चांगल्या दर्जाचे पांढरे शुभ— असावेत, त्यामुळे उमेदवारांची नावे व चिन्हे मतदारांना स्पष्टपणे दिसतील. परिणामी, मतदानासाठी लागणार्‍या वेळेमध्येही काहीही बचत होईल. शिवाय, चिन्हे ठळक दिसत नसल्यामुळे मतदार गोंधळून न जाता त्यांच्या पसंतीच्या उमेदवारास मत देऊ शकेल, असे मतही अनेक मतदारांनी मतदानानंतर व्यक्त केले.

Back to top button