Pune News : कांदा दरवाढीच्या कारणांच्या शोधासाठी केंद्रीय पथक राज्यात | पुढारी

Pune News : कांदा दरवाढीच्या कारणांच्या शोधासाठी केंद्रीय पथक राज्यात

पुणे : केंद्र सरकारने कांद्याच्या दरात अचानक वाढ होण्यामागे नेमके कोणते कारण आहे? आणि देशात प्रमुख उत्पादक असलेल्या महाराष्ट्रातील कांद्याचा शिल्लक साठा, नवे लाल कांद्याचे उत्पादन आणि दरपातळीच्या संभाव्य स्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राच्या तीनदिवसीय दौर्‍यावर केंद्र सरकारच्या चार अधिकार्‍यांचे पथक दाखल झाले आहे. त्यानंतर पथक बंगळुरूला रवाना होणार असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.

मुंबईत 6 नोव्हेंबरला आलेल्या पथकाने नाशिक जिल्ह्याचा सर्वप्रथम दौरा केला आहे. 7 नोव्हेंबरला नाशिकहून कोपरगाव, राहुरी येथे कांदा बाजारपेठांना पथकातील अधिकार्‍यांनी भेटी दिल्या असून, अधिकारी रात्री पुणे मुक्कामी येत आहेत. बुधवारी (दि. 8) केंद्रीय पथक खेड आणि आंबेगाव येथे भेटी देऊन कांद्याच्या स्थितीची माहिती घेणार असल्याचे कृषी आयुक्तालयातून सांगण्यात आले.

राज्यात गतवर्षीच्या कांदा हंगाम 2022-23 मध्ये खरीप हंगाम, लेट खरीप हंगाम आणि रब्बी-उन्हाळी कांद्याचे मिळून 120 लाख 23 हजार टन इतके उत्पादन हाती आले होते. जे चालू वर्षी खरीप, लेट खरीप हंगामात मिळून 27 लाख 55 हजार टन इतके हाती आले आहे. गतवर्षी 2022-23 मध्ये हेच उत्पादन 27.24 लाख टन हाती आले होते, तर रब्बी हंगामात गतवर्षी 93 लाख टन उत्पादन हाती आले होते. रब्बीतील कांदा लागवड सुरू झालेली आहे.

राज्यात 29.75 लाख टन साठवणूक क्षमता

महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, राज्य कृषी पणन मंडळ, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन तथा स्मार्ट प्रकल्प, शेतकर्‍यांच्या स्वतःच्या कांदा चाळी मिळून राज्यात 29 लाख 75 हजार टन इतक्या साठवणूक क्षमतेच्या कांदा चाळी आहेत. याबाबतची माहिती पथकातील अधिकार्‍यांना देण्यात येत असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button