Pune News : यूजीसीकडून 1 हजार 247 नवीन अभ्यासक्रमांना मान्यता | पुढारी

Pune News : यूजीसीकडून 1 हजार 247 नवीन अभ्यासक्रमांना मान्यता

पुणे : पुढारी वृत्तसेवा : देशातील अनेक उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये 1 हजार 247 नवीन अभ्यासक्रम शिकविण्यास विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने मान्यता दिली आहे. यापैकी काही अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही शिकवले जाणार आहेत. या सर्व सेल्फ-पेस ऑनलाइन सायलेंट कोर्सेसचे प्रवेश जानेवारी 2024 पासून उपलब्ध होतील. तर त्यांची परीक्षा मे 2024 मध्ये घेतली जाईल, असे यूजीसीने स्पष्ट केले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने यासंदर्भात सर्व विद्यापीठे आणि राज्यांना पत्र लिहिले आहे. नुकतीच आयोगाच्या बोर्डाची 23 वी बैठक उच्च शिक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत जानेवारी 2024 च्या सत्रासाठी 1 हजार 247 अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना या अभ्यासक्रमांची माहिती विभाग आणि डीन यांच्यामार्फत सार्वजनिक करण्याचे आवाहन केले आहे.

या सर्व अभ्यासक्रमांना यूजीसी (अ‍ॅक्टिव्ह-लर्निंग फॉर यंग अ‍ॅस्पायरिंग माइंड्ससाठी स्टडी वेब्सद्वारे ऑनलाइन लर्निंग कोर्सेससाठी क्रेडिट फ—ेमवर्क) नियमावली 2021 अंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा 18, 19, 25 आणि 26 मे रोजी होणार आहे. यामध्ये पदवी व पदव्युत्तर नॉन-इंजिनिअरिंगमधील 154 अभ्यासक्रम, यूजी आणि पीजी इंजिनीअरिंगमधील 743, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये 225 पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम, आयआयएममधील व्यवस्थापनमधील 63, यूजीसीमध्ये चार, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनमधील 18 अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

तर शिक्षण आणि शिक्षक प्रशिक्षणात 40 अभ्यासक्रम आहेत. याशिवाय बौद्ध धर्माचा अभ्यास करणार्‍या चार अभ्यासक्रमांनाही मान्यता देण्यात आली आहे. सर्व अभ्यासक्रमांसाठी क्रेडिट निश्चित करण्यात आले आहेत. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर हे क्रेडिट पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाशी जोडले जाईल. विशेष म्हणजे भारत आणि जगभरातील कोणत्याही देशातील कोणताही विद्यार्थी या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करून अभ्यास करू शकतो.

इथे शिकवले जाणार कोर्स

सावित्रीबाई फुले विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ, पंजाबी विद्यापीठ पटियाला, हरियाणा सेंट्रल युनिव्हर्सिटी, कुरुक्षेत्र युनिव्हर्सिटी, चौधरी देवी लाल युनिव्हर्सिटी, पंजाब युनिव्हर्सिटी चंदीगड, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ पंजाब (भटिंडा), नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, दिल्ली, काश्मीर विद्यापीठ, गुजरात विद्यापीठ, हिमाचल विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, एम्स, गुरु गोविंद सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठ दिल्ली, एचएनव्ही गढवाल विद्यापीठ, डॉ. हरिसिंग गौर विद्यापीठ, देवी अहिल्या विद्यापीठ आदी विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांकडून हे नवीन अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत.

हेही वाचा

हिंगोली: मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको; अकोला मार्ग झाला ठप्प, हजारो वाहने अडकली

India vs Sri Lanka : श्रीलंकेने टॉस जिंकला, भारत प्रथम फलंदाजी करणार

Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी पंढरपूरच्या कासेगावात ट्रॅक्टर रॅली

Back to top button