Drug racket Case : विद्येच्या माहेरात लागतेय अमली नशेची मंडी | पुढारी

Drug racket Case : विद्येच्या माहेरात लागतेय अमली नशेची मंडी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एकेकाळी अमली पदार्थ तस्करांचा वावर असणार्‍या मुंबईनंतर आता पुणेदेखील अमली पदार्थांचे हब बनू पाहतेय. नुकत्याच ड्रग्जमाफिया ललित पाटील आणि त्याच्या साथीदारांकडून सुरू असलेल्या ससून ड्रग्ज रॅकेट प्रकरणाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला. त्यामुळे पुण्याभोवती ड्रग्ज माफियांचा विळखा किती घट्ट होत आहे, ते दिसून आले. अशातच राजकीय प्रत्यारोपांच्या फैरीदेखील झाडल्या गेल्या. कधी पोलिसांवर आरोप झाले, तर कधी ससून रुग्णालय प्रशासन, तर कधी कारागृह प्रशासनावर. मात्र, राजरोसपणे तरुणांना ड्रग्जच्या नशेच्या दलदलीत ढकलणारे असे अनेक ललित पाटील राज्यात मोकाट आहेत.

ड्रग्ज तस्करीचा हा काही पुण्यातील पहिलाच प्रकार आहे, असे नाही. यापूर्वी नायजेरिअन, राजस्थानी तस्करांनी अमली पदार्थांचे आपले नेटवर्क पुण्यात स्ट्राँग केल्याचेही पुढे आले होते. डार्क वेब नेटवर्क, फूड डिलिव्हरीच्या माध्यमातून तरुणाईला नशेच्या जाळ्यात खेचणारी एक मोठी यंत्रणा पुणे आणि परिसरात हातपाय पसरत आहे. ड्रग माफियांनी शिक्षण संस्था, पब, हॉटेल्स, त्याचबरोबर शहरातील चौकांपर्यंत एलएसडी (स्टॅम्प) आणि गांजा, कोकेन, चरस, हेरॉइन असे अमली पदार्थ विक्रीचे जाळे विणले आहे. केवळ दहा महिन्यांत पोलिसांनी गांजाप्रकरणी 164 गुन्हे दाखल केले आहेत. अमली पदार्थ लावलेल्या स्टॅम्पचे 1 हजार तुकडे आणि गांजाचा एक टन साठा हस्तगत केला आहे. ही केवळ नोंद झालेली आकडेवारी आहे.

मद्याबरोबरच अमली पदार्थांची झिंग

डीजेच्या तालावर बेधुंद होऊन थिरकणारी तरुणाई आणि त्यांच्या रात्रीला अधिकच शानदार करणारी मद्याबरोबरच अमली पदार्थांची नशाखोरी. त्यामुळे मायानगरी मुंबईपाठोपाठ पुणे हे आता अमली पदार्थ तस्करांच्या रडारवर असल्याचे दिसून येते. अमली पदार्थांचा व्यवसाय म्हणजे कमीत कमी मेहनतीत जास्तीत जास्त पैसा. शहरातील अमली पदार्थांचा व्यवसाय गुंतागुंतीचा आहे.

झोपडपट्टी, लेबर कॅम्पपासून ते आलिशान वस्त्यांपर्यंत ही काळी दुनिया पसरलेली आहे. फक्त जो-तो त्याच्या ऐपतीनुसार अमली पदार्थांची नशा करतो आहे. 80 ते 90 च्या दशकात अमली पदार्थांमध्ये कोकेन, ब्राऊन शुगरची चलती होती. मात्र, काळ बदलला तसा हा व्यवसायदेखील तेवढ्याच गतीने बदलला. गुन्हेगारांनी थेट औद्योगिक वसाहतीत ड्रग्ज तयार करण्याचे कारखाने थाटले आहेत.

नायजेरिअन गुन्हेगार आघाडीवर

शहरात अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांमध्ये प्रामुख्याने नायजेरिअन गुन्हेगार आघाडीवर आहेत. गोवा, मुंबई येथून कोकेन, ब्राऊन शुगरची तस्करी ते पुण्यात करतात. त्यानंतर शहरातील कोरेगाव पार्क, मुंढवा, बाणेर, हिंजवडी येथील उच्चभ्रू परिसरातील पब, हॉटेलमध्ये त्याची विक्री करतात. राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश येथून गांजा पुणे, मुंबई शहरात पुरविला जातो.

पुण्यात नशेचा काळा बाजार

कॉलेज तरुण-तरुणींना एलएसडी (स्टॅम्प) या अमली पदार्थाची विक्री करणारी टोळी डार्कवेबद्वारे अमली पदार्थ खरेदी करीत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने या टोळीचा पर्दाफाश करीत तब्बल 1 कोटी 14 लाखांचे स्टॅम्प जप्त केले होते. त्यामुळे पुण्यात डार्क नेटवर्कद्वारे नशेचा बाजार भरत असल्याचे पुढे आले आहे. रोहन दीपक गवई, सुशांत काशिनाथ गायकवाड, धीरज दीपक ललवाणी, दीपक लक्ष्मण गेहलोत, ओंकार रमेश पाटील या पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती.

आकडे बोलतात….

(1 जानेवारी 2023 ते 6 ऑक्टोबर 2023)
गुन्हे          ड्रग्जचे वजन    किंमत
44            844 किलो     10 कोटी 11 लाख 57 हजार
120          207 किलो     7 कोटी 3 लाख 56 हजार
कोकेन, गांजा, ब्राऊन शुगर-हेरॉईन, अफू, दोडत्तचुरा, चरस, मेफेड्रॉन (एमडी), एलएसडी, एमडीएमए, मशरूम, हशीश आईल अशा अमली पदार्थांची होतेय तस्करी.

हेही वाचा

संपूर्ण सांगली जिल्हा दुष्काळी जाहीर करा : जयंत पाटील

वस्त्रोद्योगासाठी साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक : चंद्रकांत पाटील

Onion news : कांदा दरात ७२५ रुपयांची घसरण, पाच दिवसांत शेतकऱ्यांना ३६ कोटींचा तोटा

Back to top button