‘आपला दवाखाना’ अजून कागदावरच; योजनेस आधीच विलंब | पुढारी

‘आपला दवाखाना’ अजून कागदावरच; योजनेस आधीच विलंब

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात प्रस्तावित असलेला वाघोली येथील आपला दवाखाना अद्याप सुरू झालेला नाही. त्यातच आता धानोरी आणि म्हाळुंगे येथील जागा निश्चित करून आणखी दोन दवाखाने प्रस्तावित करण्यात आले आहेत. आरोग्यवर्धिनी केंद्रांप्रमाणेच आपला दवाखाना संकल्पनेसाठीही आरोग्य विभागाकडून केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत. ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या संकल्पनेमध्ये 25 हजार ते 30 हजार लोकसंख्येसाठी एक दवाखाना सुरू करावा, अशा सूचना मे महिन्यात राज्य शासनातर्फे देण्यात आल्या. जिल्ह्यात 11, तर शहरात एक दवाखाना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.

शहरातील ‘आपला दवाखाना’साठी वाघोलीतील साई सत्यम पार्क येथील जागा ठरवण्यात आली आहे. मात्र, अजूनही दवाखाना सुरू करण्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विलंब होत आहे. त्यातच आता आणखी दोन दवाखाने सुरू करण्याचा घाट घालण्यात आला आहे. प्रस्तावित ‘आपला दवाखाना’च्या कामासाठी भवन विभागाला कळवण्यात आल्याचे एका आरोग्य अधिकार्‍याने सांगितले. एकीकडे 29 आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू करण्यात अद्याप महापालिकेला यश आलेले नाही. त्यातच, ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यासही विलंब होत असल्याने आरोग्यसेवेकडे गांभीर्याने कधी पाहिले जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काय आहे आपला दवाखाना?

आपल्या दवाखान्याची वेळ दुपारी 2 ते रात्री 10 या वेळेत असणार आहे. झोपडपट्टी परिसरात आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्याच्या लहान तक्रारींसाठी दूरचा दवाखाना गाठावा लागू नये, यासाठी वस्त्यांमध्ये ‘आपला दवाखाना’ सुरू केला जाणार आहे. महिन्यातील एक दिवस ठरवून नेत्रतपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार विशेषज्ञ संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हेही वाचा

कोल्हापूर: खणदाळ येथे गोठ्यात श्वास गुदमरून ७ जनावरांचा मृत्यू

अबोली : सुयश टिळकची एन्ट्री, वेगवेगळ्या रुपात दिसणार अभिनेता

Pune News : शॉर्टसर्किटमुळे पिंपरखेड येथे 3 एकर उसाला आग

Back to top button