Pune News : शॉर्टसर्किटमुळे पिंपरखेड येथे 3 एकर उसाला आग | पुढारी

Pune News : शॉर्टसर्किटमुळे पिंपरखेड येथे 3 एकर उसाला आग

पिंपरखेड : पुढारी वृत्तसेवा :  वीजवाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन पिंपरखेड (ता. शिरूर) येथील शेतकरी धोंडीभाऊ रामभाऊ उंडे यांच्या ऊसशेतात आग लागली. या आगीत 3 एकर ऊस आणि अंदाजे दीड लाख रुपयांचा ठिबक संच जळाला. सोमवारी (दि. 16) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, अशी माहिती उंडे यांचे हिस्सेदार दशरथ देवराम गावडे यांनी दिली. धोंडीभाऊ उंडे यांच्या ऊसशेतातून गेलेल्या वीजवाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. स्थानिकांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग नियंत्रणात आणण्यात अडचणी आल्या.

आगीत जळालेला ऊस हा 10 महिन्यांचा होता. यासाठी सुमारे दीड लाख रुपये भांडवली खर्च झाला होता. अजून साखर कारखाने चालू झालेले नसल्याने जळालेल्या उसाचे काय करायचे? असा प्रश्न बाधित शेतकरी उंडे यांना पडला आहे. आगीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणीही उंडे यांनी केली आहे. या दुर्घटनेला पूर्णपणे महावितरण जबाबदार असल्याचा आरोप गावडे यांनी
केला आहे.

या भागात उसाचे क्षेत्र मोठे असून, अनेक उसावरून वीजवाहक तारा गेलेल्या आहेत. त्या तारांमध्ये अनेक ठिकाणी झोळ पडलेले असून, याबाबत महावितरणला वारंवार कल्पना देण्यात आलेली आहे. मात्र, तरीही महावितरणकडून दुर्लक्ष केल्याने आगीची ही घटना घडली. जळीत उसाचा पंचनामा महावितरणचे सहायक अभियंता दीपक देशमुख, तलाठी अमोल ठिगळे, पोलिस पाटील सर्जेराव बोर्‍हाडे यांनी केला. महावितरण विभागाने दिरंगाई न करता बाधित शेतकर्‍यास नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ह.भ.प. रामदास गावडे यांनी केली आहे.

पंचनामा करून तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. महावितरणच्या अभियंत्यांकडून पाहणी करून योग्य कार्यवाही करण्यात येईल.
                        दीपक देशमुख, सहायक अभियंता, महावितरण निरगुडसर 

हेही वाचा : 

Back to top button