Pune News : महापालिकेच्या लिफ्टमध्ये कर्मचारी अडकला अन्... | पुढारी

Pune News : महापालिकेच्या लिफ्टमध्ये कर्मचारी अडकला अन्...

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेचा कर्मचारी लिफ्टमध्ये अडकल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. अग्निशामक दलाचे जवान, कर्मचारी व सुरक्षा रक्षकांच्या सव्वा तासाच्या अथक परिश्रमानंतर कर्मचार्‍याला सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळाले. महापालिका नवीन इमारतीमध्ये सहा आणि जुन्या इमारतींमध्ये चार लिफ्ट आहेत. या लिफ्ट देखभाल दुरुस्तीसाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, यातील अनेक लिफ्ट अचानकपणे बंद पडतात. या लिफ्टमध्ये नागरिकांसह कर्मचारीही अडकतात. मात्र, प्रशासनाने यावर अध्याप कोणतीही ठोस उपाय योजना केलेली नाही.

दरम्यान, महापालिकेच्या गाडीखाना येथे कार्यरत असलेले संतोष साठे हे कर्मचारी मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कामासाठी महापालिका भवनमध्ये आला होता. वित्त व लेखा विभागात बीले सादर करून साठे तेथील लिफ्टने तिसर्‍या मजल्यावरील आरोग्य विभागात जात होता. मात्र दोन आणि तिन मजल्याच्या मध्येच साडेपाचच्या सुमारास अचानक लिफ्ट बंद पडली. त्यानंतर साठे यांनी चार ते पाच वेळा बेल वाजवली, मात्र कोणीही मदतीला आले नाही. शेवटी साठे यांनी आरोग्य विभागातील ओळखीच्या कर्मचार्‍यास फोन करून आपण लिफ्टमध्ये अडकल्याचे सांगितले.

आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी लिफ्टमनला बोलावून साठे यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीय यश मिळताना दिसत नव्हते. त्यामुळे अग्निशामक दलास कळविण्यात आले. अग्निशामक दलाची गाडी आली. अग्निशामकचे जवान, सुरक्षा रक्षक आणि लिफ्टची देखभाल दुरुस्ती करणार्‍या ठेकेदाराचा कर्मचारी यांनी प्रयत्न केले. मात्र, काहीच मार्ग निघेना, लिफ्टचा दरवाजाही उघडेना. तब्बल सव्वा तास लिफ्टमधून साठे यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. प्रयत्नांना यश मिळत नसल्याने सर्वच घाबरले होते. कर्मचारी बाहेरून साठे यांना आवाज देवून धीर देण्याचे काम करत होते. अखेर अथक प्रयत्नानंतर पावणे सात वाजता साठे यांना बाहेर काढण्यात यश आले.

या अगोदर देखील अशा घटना घडल्या आहेत. घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातील लिफ्ट महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अडकून पडले होते. तसेच त्याआधी कमला नेहरू हॉस्पिटल मधील लिफ्ट बंद पडल्याने रुग्णांची हेळसांड झाली होती. आता या घटनेमुळे पालिकेच्या लिफ्टचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे.

दरवाजाची चावी योग्यप्रकारे लावली गेली नाही, त्यामुळे चावी तुटली. परिणामी लिफ्टमध्ये अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यास वेळ लागला. या घटनेची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अशा घटना टाळण्यासाठी प्रत्येक मजल्यावर लिफ्टच्या चाव्या ठेवण्यात येतील. तसेच जास्तच्या चाव्या सुरक्षा विभागाकडे ठेवण्यात येतील. याशिवाय अडकलेल्या वक्तींना बाहेर काढण्याचे प्रशिक्षण सुरक्षा रक्षकांना देण्यात येणार आहे.

– श्रीनिवास कंदुल, विभागप्रमुख, विद्युत विभाग

हेही वाचा

PSI Somnath Zende : एका रात्रीत करोडपती झालेला पीएसआय निलंबित; काय आहे नेमकं कारण?

Nashik News : मनसे शहराध्यक्षांसमोर पक्षांतर्गत गटबाजीचे आव्हान, निवडीवरून नाराजीचा सूर

रस्ता करीत असताना सापडली दोनशे वर्षांपूर्वीची लाकडी नौका

Back to top button